उरुळी कांचन परिसरात पावसाने नर्सरीचे नुकसान

उरुळी कांचन- सोरतापवाडी, नायगाव, उरुळी कांचन, शिंदवणे (ता. हवेली) या परिसरात सोमवारी (दि. 21) रात्री झालेल्या पावसामुळे नर्सरी व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोरतापवाडी हद्दीतील वायकर वस्तीमधील ओढ्याचे पाणी पुणे-सोलापूर महामार्गावर, तसेच रस्तालगत असणाऱ्या नर्सरीत आल्याने सर्वत्र पाणी साचले होते.

सोमवारी (दि. 21) रात्री कुंजीरवाडी, सोरतापवाडी, आळंदी, उरुळी कांचन, टिळेकरवाडी, खामगाव, भवरापूर, कोरेगाव मुळ आदी परिसरात जोरदार पाऊस झाला, त्यामुळे ओढे-नाले तुडुंब वाहत होते. सोरतापवाडी हद्दीतील कुंजीरवाडी-आळंदी रस्त्यालागत असणाऱ्या ओढ्याचे पात्र अरुंद असल्याने पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाला होता. ओढा खोलीकरणाची कामे न झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर आले आणि पुणे-सोलापूर महामार्गावर पाणीच पाणी झाले होते. पावसाचे पाणी महामार्गावर आल्याने काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती.

या भागात ओढ्याच्या खोलीकरणाची कामे झालेली नसल्याने पावसाचे पाणी काही शेतकऱ्यांच्या शेतात, तर महामार्गालगत असणाऱ्या नर्सरी व्यावसायिकांच्या नर्सरीत पाणी साठले. त्यामुळे या व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांच्या भाजीपाला पिकाचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.