बॉलीवूडमधील घराणेशाही दिवसेंदिवस विस्तारताना दिसत आहे. सध्या बी-टाऊनमध्ये चर्चेत असणाऱ्यांपैकी अनेक जणांची कौटुंबिक पार्श्वभूमी सिनेसृष्टीशी निगडित आहे. आई-वडिलांबरोबरच अनेक जणींच्या बहिणी या सिनेसृष्टीतील नायिका आहेत.
परिणती चोप्रा, आलिया भट ही याची उत्तम उदाहरणे. आता याच यादीत कृती सेननही दाखल झाली आहे. आता तुम्ही म्हणाल कृती कुणाची बहीण? तर मंडळी ती नव्हे, तर कृतीची बहीण नुपूर आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या नुपूर अक्षयकुमारसोबत एका म्युझिक व्हिडीओमध्ये काम करत आहे. मात्र, आपल्याला आज ना उद्या बॉलीवूडमध्ये यायचंच आहे, असे नुपूर सागंते. “फिलहाल’ या गाण्यामध्ये नुपूर अक्षयसोबत झळकणार आहे.
नुपूर म्हणते की, ही माझी पहिली ऍक्टिंग असाईनमेंट होती. पहिल्या असाईनमेंटलाच इतक्या मोठ्या कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य मानते. येणाऱ्या काळासाठी माझ्याकडे काही स्क्रिप्टस् आल्या आहेत. तसेच मी लूक टेस्टही दिल्या आहेत; पण सध्या तरी मी या गाण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानंतरच मी पुढचा विचार करणार आहे, असे नुपूर सांगते. आता भगिनी यशाची परपंरा नुपूर कशी पुढे चालू ठेवते हे पाहायचे !