पुढील आठवड्यापासून 3 दिवसांत मोबाइल कंपनी बदलता येणार
पुणे – आपला मोबाइल नंबर न बदलता मोबाइल कंपनी बदलण्याची सुविधा नंबर पोर्टेबिलिटीच्या माध्यमातून ग्राहकांना मिळते. मात्र, 9 ते 16 डिसेंबरपर्यंत ही सुविधा तांत्रिक तयारीसाठी बंद ठेवली आहे. 16 डिसेंबरनंतर ग्राहकांना केवळ 3 दिवसांत नंबर न बदलता मोबाइल कंपनी बदलता येणार आहे.
दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे “ट्राय’ने ही माहिती जारी केली आहे. सर्व मोबाइल कंपन्यांना ग्राहकांना याबाबत कळविण्यासा सांगितले आहे. गेल्या महिन्यातच ही सुधारित सुविधा देण्यात येणार होती. मात्र, तांत्रिक तयारी पूर्ण न झाल्यामुळे ही तारीख पुढे ढकलली होती. याअगोदर कंपनी बदलण्यासाठी एक आठवड्यापेक्षा जास्त काळ लागत होता. त्याचबरोबर हा बदल कंपन्यांकडे सोपविला होता. त्यामुळे पोर्टेबिलिटीची विनंती आल्यानंतर कंपन्या ग्राहकांना अनेक कारणांमुळे कंपनी बदलून देण्यास टाळाटाळ करीत होत्या.
मात्र, आता हे काम कंपन्यांकडून काढून घेतले असून पोर्टेबिलिटी सर्विस प्रोव्हायडरकडे देण्यात आले आहे. आता ग्राहकांना विनंती केल्यानंतर हे काम लगेच सुरू होणार असून यासाठी युनिक पोर्टिंग कोड तयार केला आहे. ग्राहकाने 1900 या क्रमांकावर पोर्टेबिलिटीची विनंती केल्यानंतर ग्राहकाला हा कोड मिळणार आहे. हा कोड 15 दिवस वैध राहणार आहे. या आधारावर 3 दिवसांपेक्षा कमी वेळामध्ये कंपनी बदलता येणार आहे. एकाच सर्कलमधील पोर्टेबिलिटीला 3 दिवस लागतील तर, सर्कल बदलायचे असल्यास 5 दिवस लागतील. कंपन्यांना नंबर बदलायचे असल्यानंतर मात्र 5 दिवस लागणार आहेत.