जिल्ह्यात 1 हजार 347 कामांवर 11 हजार 310 मजूर
नगर: गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने यंदा मोठ्या प्रमाणात नागरिकांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शासनाकडून ही दुष्काळावर मात करण्यासाठी व नागरिकांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 1 हजार 347 कामे सुरु करण्यात आली असून, 11 हजार 310 मजूर काम करत आहेत. गेल्यावर्षी 6 हजार मजूर रोजगार हमीवर काम करत होते. यंदा मात्र, दुष्काळाची तीव्रता पाहता या मजुरांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे.
सध्या योजनेअंतर्गत जिल्ह्यात 1 हजार 347 कामे सुरू करण्यात आली आहेत. तेथे 11 हजार 310 नागरिकांना रोजगार देण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीदारम्यान मजुरांची संख्या झपाट्याने कमी झाली होती. आता मात्र पुन्हा रोजगार हमीकडे मजूर वळाले असल्याचे दिसत आहे. शेवगाव तालुक्यात 1 हजार 624 मजूर असून, 50 कामे सुरु आहेत. त्यापाठोपाठ कर्जत, पारनेर, जामखेड पाथर्डी तालुक्यांत मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. यामध्ये मोठ्याप्रमाणात रस्त्याची कामे करण्यात येत आहेत, तर कृषी विभागाकडून कंपार्टमेंट बंडिंग, वनविभागाकडून वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदने अशा अनेक प्रकारची कामे सुरू आहेत.
कर्जत-जामखेडमध्ये मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार अभियानाची कामे झाली असूनही दुष्काळाची तीव्रता ही मजुरांच्या आकडेवारी वरून दिसत आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात मे 2018 अखेर 6 हजार मजूर रोजगार हमीवर काम करत होते. परंतु यंदा पावसाने हुलकवणी दिल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळाचे सावट पसरले आहे. त्यामुळे नागरिकांच्या हाताला काम नसल्याने शासनाकडून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 11 हजार 310 मजूरांच्या हाताला काम मिळाले आहे.
शासनाकडून दुष्काळाच्या परिस्थितीत गरज असेल त्या प्रत्येकाला रोजगार पुरविण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या प्रत्येक मजुरास प्रती दिवस दोनशे सहा रुपये मजुरी देण्यात येते. काम संपल्यानंतर 15 दिवसांच्या आतमध्ये संबंधित मजुराचा पगार त्याच्या बॅंकेच्या खात्यावर जमा करण्यात येतो. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम मिळाले आहे.
तालुकानिहाय कामे व मजूर संख्या
अकोले तालुक्यात 199 कामे सुरु असून 768 मजूर आहेत. जामखेड 83 कामांवर 968 मजूर. कर्जतमध्ये 98 कामे 1 हजार 385 मजूर. कोपरगाव 46 कामे 191 मजूर, नगर 81 कामावर 1 हजार 130 मजूर. नेवासा 43 कामे 282 मजूर, पारनेर 124 कामे 1 हजार 270 मजूर, पाथर्डी 91 कामे 692 मजूर. राहाता 126 कामे 440 मजूर, राहुरी 72 कामे 325 मजूर, संगमनेर 114 कामे 1 हजार 222 मजूर, शेवगाव 103 कामे 1 हजार 624 मजूर, श्रीगोंदा 114 कामे 723 मजूर, श्रीरामपूर 53 कामे 333 मजूर काम करत आहेत.