- हडपसर परिसरालाच सर्वाधिक ‘बाधा’
- सहा क्षेत्रीय कार्यालयांत करोनाचा सर्वाधिक प्रसार
पुणे – शहरात करोनाचा आलेख उतरणीला लागलेला असतानाच, महापालिकेच्या पंधरामधील सहा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत सरासरी दहा हजारांपेक्षा अधिक नागरिकांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्याततही सर्वाधिक तब्बल 15 हजार 915 बाधित एकट्या हडपसर क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील असून उर्वरित चार क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नगररस्ता- वडगावशेरी, सिंहगड रस्ता, धनकवडी, वारजे कर्वेनगर, तसेच कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील आहेत.
पहिल्या टप्प्यात करोना साथीचा फैलाव शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पेठांसह भवानीपेठ परिसरात वेगाने झाला. तर, ढोले-पाटील रस्ता आणि येरवडा परिसरातही झोपडपट्टीत ही साथ वेगाने पसरली. लॉकडाउनमध्ये सुरूवातीचे दोन महिने कडक लॉकडाऊन आणि वेळीच बाधित सापडलेला भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केल्याने ही साथ काही ठराविक भागात मर्यादित होती.
मात्र, लॉकडाउन शिथिल होताच या साथीचा प्रसार नगररस्ता, औंध, बाणेर, कोथरूड तसेच सिंहगड परिसरात झाला. यानंतर बिबवेवाडी आणि धनकवडी परिसरात ही साथ पसरली. ऑगस्टअखेर ही साथ हडपसर भागात वेगाने पसरण्यास सुरूवात झाली आहे. त्यानंतर आता बाधितांचा आकडा दररोज 200 ते 250 पर्यंत खाली आला असला, तरी हडपसर हद्दीत सर्वाधिक बाधित सापडत आहेत.
अशी आहे 28 ऑक्टोबरपर्यंतची स्थिती
क्षेत्रीय कार्यालय……… एकूण करोनाबाधित
हडपसर-मगरपट्टा……….15,915
धनकवडी………………..15,298
सिंहगड रस्ता…………..12,393
नगर रस्ता……………..12,072
वारजे-कर्वेनगर…………12,323
कसबा- विश्रामबागवाडा…..11,633
बिबवेवाडी…………………9,932
कोथरूड बावधन……………9,755
येरवडा-कळस-धानोरी………8,774
कोंढवा-येवलेवाडी………….7,611
ढोले-पाटील रस्ता -…………7,575
औंध-बाणेर………………..7,449
भवानीपेठ…………………6,835
शिवाजीनगर………………6,399
वानवडी-रामटेकडी ………6,172
काही भागांत परिस्थिती सुधारली
काही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दररोजचा करोना बाधितांचा आकडा 50 च्या खाली गेल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. ढोले पाटील रोड, शिवाजीनगर, भवानी पेठ परिसरातील परिस्थिती सुधारली असून या तिन्ही ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून दररोजचा करोना पॉझिटिव्हचा आकडा पन्नासच्या खाली गेल्याचे दिसून आले. तर, हडपसर-मुंढवा परिसरात अजूनही करोनाचे सर्वाधिक बाधित आढळून येत आहेत.