पिंपरी – चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा सायली नढे यांच्यासह 32 जणांनी 62 उमेदवारी अर्ज शुक्रवार (दि.3) विकत घेतले आहेत. चिंचवडमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी झाली असून शुक्रवारपर्यंत तब्बल 93 जणांनी 170 अर्ज नेले आहेत. तर चार उमेदवारांनी पाच अर्ज दाखल केले आहेत.
चिंचवड विधानभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार अद्यापही जाहीर झालेला नाही. भाजपची उमेदवारी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबाताच दिली जाणार आहे. गुरूवारी आमदार जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी अर्ज नेला. तर शुक्रवारी शंकर जगताप यांनी अर्ज नेला आहे. त्यामुळे या दोघांपैकी भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार याची चर्चा सध्या शहरातील राजकीय वतुर्ळात रंगली आहे.
शुक्रवारी थेरगावातील “ग’ क्षेत्रीय कार्यालयातून 32 इच्छुकांनी 62 अर्ज नेले आहेत. तसेच रफिक कुरेशी यांनी अर्ज दाखल केला आहे. शुक्रवारपर्यंतच तब्बल 93 इच्छुकांनी 170 अर्ज नेले आहेत. तर चार उमेदवारांनी पाच अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे एखाद्या पोटनिवडणुकीत इच्छुकांची संख्येचा विक्रम होतो की काय? असाच काहीसा प्रकार इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे निर्माण झाला आहे. पोटनिवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता सुरुवातीला वर्तविली जात होती. मात्र ती फोल ठरली आहे.
“या” इच्छुकांनी घेतले उमेदवारी अर्ज
भाजपचे चिंचवड विधानसभा प्रचार प्रमुख शंकर जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा सायली नढे यांच्यासह संतोष नवले, शंकर माने, राजेश नागोसे, नंदू बारणे, प्रविणकुमार कदम, श्रीकांत गोरे, मनोज खंडागळे, सतिश कांबिये, सुरेश जगधने, प्रतिमा राजे, दिलीप पांढारकर, राहूल मदने, ऍड. मिलिंद कांबळे, मेहूल जोशी, श्रीगणेश कदम, दयानंद सरवदे, ज्ञानेश्वर मलशेट्टी, रवि नांगरे, निखिल भोईर, भाग्यश्री भोईर, झेवियर ऍन्थोनी, सचिन धनकुडे, सुहास गजरमल, आनंद काटे, प्रियांका कदम, स्वप्निल बनसोडे, राजश्री कोरडे अशा 32 जणांनी 62 अर्ज शुक्रवारी नेले आहेत.
राहुल कलाटेंची भूमिका गुलदस्त्यात
सन 2019 साली चिंचवड विधानसभेची निवडणूक लढविलेले शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी आतापर्यंत आपली भूमिका जाहीर केलेली नाही. गतवेळच्या निवडणुकीत त्यांना भाजपविरोधी सर्वच पक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे त्यांनी 1 लाख 12 हजार इतकी मते घेतली होती. होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना, कॉंग्रेससह राष्ट्रवादीकडे इच्छुकांची भाऊगर्दी आहे. अपक्षाच्या पाठिमागे जाण्याची भूमिका कोणत्याच पक्षाची दिसून येत नाही. त्यामुळे राहूल कलाटे नेमकी काय भूमिका घेणार याकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे. कलाटे यांनी छुप्या पद्धतीने तयारी चालविली असली तरी कोणतीच जाहीर भूमिका न घेतल्यामुळे ते काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.