संयुक्तराष्ट्रे – संयुक्त राष्ट्रांमार्फत आयोजित करण्यात आलेली अण्वस्त्र परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. संयुक्तराष्ट्रांच्या न्यूयॉर्क मुख्यालयात येत्या 27 एप्रिल रोजी ही परिषद होणार होती. करोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पाच वर्षांच्या अवधीनंतर अण्वस्त्र प्रसार रोखण्यासाठी त्या परिषदेत महत्वाचा आंतरराष्ट्रीय करार होणे अपेक्षित होते. त्यात जगातील 191 देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार होते.
संयुक्तराष्ट्रांच्या पुढाकाराने अण्वस्त्र प्रसार बंदीचा करार झाला असून संपूर्ण जगाने हा करार स्वीकारला आहे. या कराराला येत्या 5 मार्च रोजी 50 वर्ष होत आहेत. त्यातून जगातून अण्वस्त्रांचा प्रसार थांबला आहे. ज्यांच्याकडे अण्वस्त्र आहे ती नष्ट करण्याचेही प्रयत्न सध्या सुरू आहेत. टप्प्याटप्प्याने ही अण्वस्त्रे नष्ट करण्यावर बहुतेक देशांचे एकमत झाले आहे. त्याउलट अण्विक शक्तीचा शांततापुर्ण कार्यासाठी कसा उपयोग करायचा यावर साऱ्या जगाने लक्ष केंद्रित केले आहे. याच अनुषंगाने या परिषदेत चर्चा होणार होती.