अनिवासी नवरदेव रडारवर! (भाग-१)

परदेशातला नवरा हवा, अशी अनेक मुलींची इच्छा असते. मुलीच्या आईवडिलांनाही परदेशातला जावई मिळाला की भरून पावल्यासारखे वाटते. अशा लग्नांमध्ये फसवणुकीचे अनेक प्रकार घडले असूनसुद्धा ही “क्रेझ’ कायम असणे अधिक चिंताजनक आहे. आनंदाच्या भरात परदेशातल्या स्थळाची व्यवस्थित चौकशीही केली जात नाही. परदेशी संस्कृती स्वीकारूनसुद्धा आपली पाळेमुळे भारतीय संस्कृतीत रुजलेली आहेत, असे म्हणणारे मुलाचे आईवडीलसुद्धा आपल्या सुनेच्या आत्मसन्मानाची फिकीर करत नाहीत.

अनिवासी भारतीय नवरदेवांकडून बऱ्याच वेळा होणाऱ्या फसवणुकीला वेसण घालण्यासाठी राज्यसभेत विधेयक सादर करण्यात आले आहे. अनिवासी भारतीय म्हणजे एनआरआय नवरदेवांना लग्नाच्या नोंदणीबरोबरच अन्य प्रकारची कायदेशीर सक्‍ती करण्याची गरज अनेक वर्षांपासून व्यक्‍त केली जात होती. लग्नानंतर एनआरआय पतीने पत्नीला सोडून दिल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. एवढेच नव्हे तर परदेशी मुलाबरोबर लग्न करणाऱ्या मुलींशी वाईट व्यवहार केला गेल्याच्या बातम्याही सातत्याने येत असतात. आता असे काही करणाऱ्या एनआरआय नवरदेवांचा पासपोर्टच रद्द करण्याची तरतूद केली जाणार आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाईसुद्धा केली जाईल. अशा प्रकरणांत भारतात येऊन फसवणूक करून लग्न करणाऱ्या एनआरआय नवरदेवांच्या विरोधात समन्स, वॉरंट जारी करण्याची तयारी परराष्ट्र मंत्रालयाने दर्शविली आहे. या समन्सला काही उत्तर आले नाही तर संबंधित नवरदेवाला फरारी आरोपी घोषित करण्यात येणार आहे आणि त्याची मालमत्ता जप्त केली जाणार आहे. कायदा मंत्रालय, गृह मंत्रालय आणि महिला व बालकल्याण मंत्रालयाने या प्रस्तावावर सहमती दर्शविली आहे.

गेल्या वर्षी परराष्ट्र मंत्रालयाने असे सांगितले होते की, एनआरआय नवरदेवांकडून त्रास सहन कराव्या लागणाऱ्या भारतीय महिलांनी गेल्या तीन वर्षांत तीन हजारपेक्षा अधिक तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेऊन फरारी पतीदेवांविरुद्ध वॉरंट जारी करणे आणि त्यांना समन्स धाडण्यासाठी एक पोर्टल तयार केले जाणार असून, अशा मंडळींची भारतातील संपत्ती जप्त करण्यासारखे कठोर निर्णय घेण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वी पंजाबच्या महिला आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, अनिवासी भारतीयांकडून पत्नीला सोडून दिल्याचे तीस हजारांहून अधिक खटले एकट्या पंजाबात प्रलंबित आहेत. राज्य महिला आयोगाने केंद्र सरकारला यासंदर्भात कायदा करण्याचा आग्रह केला होता आणि सोडून दिलेल्या महिलांच्या दुर्दशेकडे लक्ष वेधले होते. या सर्व महिला एनआरआय पतीकडून झालेल्या फसवणुकीला आणि शोषणाला बळी पडल्या आहेत. एकट्या पंजाबात अशी तीस हजारांहून अधिक प्रकरणे प्रलंबित असणे गंभीर असून, या विषयाचे गांभीर्य त्यावरूनच अधोरेखित होते.

अनिवासी नवरदेव रडारवर! (भाग-२)

आयोगाने असे म्हटले होते की, संबंधित एनआरआय दोषी शाबित होईल, अशी परिस्थिती असल्यास तातडीने त्याच्या प्रत्यार्पणासाठी हालचाली केल्या पाहिजेत आणि जोपर्यंत तो आपल्या पत्नीला नुकसानभरपाई देत नाही, तोपर्यंत त्याचा पासपोर्ट जप्त केला पाहिजे. अशा प्रकारची कठोर पावले उचलल्यास अनेक मुलींचे संसार उद्‌ध्वस्त होण्यापासून वाचविता येतील. त्याचप्रमाणे परिणामांची धास्ती न बाळगता आपल्या स्वार्थासाठी भारतीय कायद्यांचा दुरूपयोग करणाऱ्यांनाही जरब बसेल. केंद्र आणि राज्य सरकारने अशा प्रकरणांमध्ये गंभीरपणे लक्ष घातल्यास परदेशातील युवकांबरोबर लग्न करणाऱ्या मुलींना मोठा दिलासा मिळू शकेल. केवळ पंजाबातीलच नव्हे तर देशाच्या अनेक राज्यांमधील हजारो कुटुंबे आज परदेशांत स्थायिक झाली आहेत. विशेषतः कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि अमेरिकेत सर्वाधिक संख्येने अनिवासी भारतीय राहतात. त्यातील अनेक कुटुंबांतील सदस्य घरातील मुलासाठी वधू शोधायला भारतात येतात. अशा वैवाहिक नात्यांचा सर्वांत दुःखद पैलू असा की, आयुष्यभरासाठी एकत्र आणणाऱ्या या नात्याविषयी अनेक भावी नवरदेव आणि त्यांच्या कुटुंबीयांची समजूत पहिल्यापासूनच चुकीची असते. त्यामुळे अशा अनेक घटना घडल्या असून, परदेशात स्थायिक झालेले युवक भारतीय युवतींशी लग्न तर करतात; परंतु लग्नाविषयीच्या आपल्या जबाबदारीबद्दल ते फारसे गंभीर नसतात. ही मंडळी नाते जोडण्यासाठी नव्हे तर आपल्या फायद्यासाठी लग्न करू इच्छितात.

– ऍड. प्रदीप उमाप

Leave A Reply

Your email address will not be published.