देशभर एनआरसी राबवणार : शहा : प. बंगालमध्ये होणार नाही : ममता

घाबरण्याची गरज नाही; धर्माच्या आधारावर नोंदणीची तरतूद नाही
नवी दिल्ली : आसाममध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी)जशी राबवली तशी देशभर राबवण्यात येईल. मात्र त्यात धर्माच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही. हिंदु, बुध्द, जैन, ख्रिश्‍चन, शिख आणि पारशी धर्मीयांनी धार्मिक अल्पसंख्यांक असल्यामुळे पाकिस्तान, अफगाणीस्तान अणि बांगलादेशात अत्याचार झाल्याने येथे आले असतील तर अशांनाही भारताचे नागरिकत्व देण्यात येईल, त्यामुळे कोणत्याही धर्माने घाबरून जाण्याची गरज नाही, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी राज्यसभेत स्पष्ट केले. मात्र, शहा यांच्या या वक्तव्याला प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कडाडून विरोध केला आहे. राज्यात एनआरसी करू देणार नाही, असे त्यांनी बंगालवासीयांना आश्‍वस्त केले.

राज्यसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासाला पुरवणी प्रश्‍नावर उत्तर देताना शहा म्हणाले, एनआरसीमध्ये अमुक एका धर्माला वगळावे, अशी कोणतीही तरतूद नाही. धर्म वगळून देशाचे नागरिक म्हणून एनआरसीमध्ये नोंदणी करण्यात येईल. एनआरसीही नागरिकत्व सुधारणा विधेयकापेक्षा वेगळे आहे. एनआरसीची अंतिम यादी 31 ऑगस्ट रोजी प्रकाशित करण्यात येईल. आसाममध्ये सुमारे 19 लाख जण राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीतून वगळले आहेत.

ज्यांची नावे वगळण्यात आली आहेत, अशा व्यक्ती आसामध्ये उभी करण्यात आलेल्या प्राधिकरणाकडे दाद मागू शकतात. ज्यांना वकीलाकडे जाणे परवडणारे नाही, त्यांना आसाम सरकारच्या वतीने मदत करण्यता येईल, असे शहा यांनी स्पष्ट केले. हिंदु, बुध्द, जैन, ख्रिश्‍चन, शिख आणि पारशी धर्मीयांनी धार्मिक अल्पसंख्यांक असल्यामुळे पाकिस्तान, अफगाणीस्तान अणि बांगलादेशात अत्याचार झाल्याने येथे आले असतील तर अशांनाही भारताचे नागरिकत्व देण्यात येईल,

उत्तराखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश, झारखंड यासारख्या भाजपाची सरकार असणाऱ्या राज्यांनी आसामप्रमाणे एनआरसी करण्याची मागणी या पुर्वी केली आहे.

दरम्यान, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीशहा यांच्या वक्तव्याला जोरदार विरोध केला. त्या म्हणाल्या, आसाममधून 14 लाख बंगाली आणि हिंदुंना आसाममधील एनआरसीमधून वगळण्यात आले आहे. त्याचेच उत्तर भारतीय जनता पक्षाने आधी द्यावे. एनआरसी करावी म्हणून अगदी मोजके लोक राज्यात अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छिते, की राज्यात एनआरसी होऊ देणार नाही. तुमचे राष्ट्रीयत्व कोणीही हिरावून घेऊन तुम्हाला आश्रीत बनवू शकणार नाही. धर्माच्या नावावर विभाजन होऊ देणार नाही.

असाममध्ये एनआरसीतून 19 लाख 60 हजार जणांच्या राष्ट्रीयत्वावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाल्याने प. बंगालमध्ये घबराट निर्माण झाली असून या प्रस्नावर उसळलेल्या दंगलीत आतापर्यंत 11 जणांनी प्राण गमावले आहेत. आसाममधील यादीत बंगाली आणि हिंदु 14 लाख असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.