fbpx

महाराष्ट्र बॅंकेला दुसऱ्या तिमाहीत 130 कोटींचा नफा

एनपीए कमी करण्यात यश

पुणे – बॅंक ऑफ महाराष्ट्रने सोमवारी सप्टेंबरअखेर संपलेल्या दुसऱ्या तिमाहीचा ताळेबंद जाहीर केला. या ताळेबंदानुसार बॅंकेला या तिमाहीत 130 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या वर्षी दुसऱ्या तिमाहीत बॅंकेला 115 कोटी रुपयांचा नफा झाला होता. 

बॅंकेने ताळेबंद जाहीर केल्यानंतर मुंबई शेअरबाजारावर महाराष्ट्र बॅंकेचा शेअर 7 टक्‍क्‍यांनी तर राष्ट्रीय शेअरबाजारावर 6.73 टक्‍क्‍यांनी वाढला. बॅंकेने अपेक्षेपेक्षा चांगला ताळेबंद जाहीर केला असे गुंतवणूकदारांना वाटते.

गेल्या वर्षातील दुसऱ्या तिमाहीच्या 3 हजार 296 कोटी रुपयांच्या तुलनेत यावर्षी दुसऱ्या तिमाहीत बॅंकेचे उत्पन्न 3 हजार 319 कोटी रुपये इतके झाले आहे.

मात्र, बॅंकेला खराब कर्जापोटी कराव्या लागणाऱ्या तरतुदीत वाढ करावी लागली आहे. या तिमाहीत बॅंकेने अशा कर्जासाठी 420 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत बॅंकेने 293 कोटी रुपयांची तरतूद केली होती.

लॉकरच्या भाड्याची हिशेब पद्धत बॅंकेने बदलली आहे. जुन्या पद्धतीनुसार हिशेब केला असता तर बॅंकेचा नफा वाढला असता असे बॅंकेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

एनपीए कमी करण्यात यश
या तिमाहीत बॅंकेचे ढोबळ एनपीए केवळ 8.81 टक्‍के नोंदले गेले आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत बॅंकेचे ढोबळ एनपीए 16.86 टक्‍के इतके होते. त्याचबरोबर निव्वळ एनपीए 5.48 टक्‍क्‍यांवरून 3.30 टक्‍के करण्यात बॅंकेला यश मिळाले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.