मुंबई – जेम्स बॉण्ड म्हटले की एका हातात बंदूक आणि दुसऱ्या हाताने मादक ललनेला जवळ धरणारा बॉण्ड आपल्याला आठवतो. आतापर्यंत रॉजर मूर, शॉन कॉनेरी, पीअर्स ब्रॉस्नन, डिमोथी डाल्टन, जॉर्डन लेजेनबे आणि डॅनियल क्रेग यांनी जेम्स बॉण्डची भूमिका साकारली आहे.
दरम्यान, जेम्स बॉण्डची भूमिका साकारणारे दिग्गज अभिनेते ‘शॉन काॅनेरी’ यांचं नुकतंच वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं. काॅनेरी यांनी सात सिनेमांमध्ये जेम्स बॉण्डची भूमिका साकारली होती. ‘डॉक्टर नो’ हा त्यांचा पहिला बॉण्डपट होता. त्यामध्ये त्यांनी वापरलेल्या मूळ पिस्तुलाचा लिलाव होणार आहे. जेम्स बॉण्ड यांची पिस्तुल खरेदी करून शॉन कॉनेरी यांच्या आठवणी जगण्याची संधी जगभरातील चाहत्यांना मिळणार आहे.
येत्या 3 डिसेंबर रोजी बेवर्ली हिल्स येथे तसेच ऑनलाईन पद्धतीने जुलियन्स ऑक्शनतर्फे ‘आयकाॅन्स अँड आयडॉल्स ट्रायलॉजीŠ हॉलिवूड’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जेम्स बॉण्ड यांची मूळ पिस्तुल (हॅण्डगन) विक्रीला ठेवण्यात आली आहे. यापूर्वी देखील या हॅण्डगनची विक्री झाली होती.
शॉन कॉनेरी यांनी ‘डॉक्टर नो’ या पदार्पणातील सिनेमात हातात गन घेऊन ‘जेम्स बॉण्ड 007’ चे व्यक्तिमत्व उभे केले. आणि पुढे सहा दशके ‘डॅशिंग’ पणाने रसिकांच्या ह्दयावर अधिराज्य केले. मात्र, 2006 पासून डॅनियल क्रेग याने सलग पाच बॉण्डपटामध्ये जेम्स बॉण्ड साकारला आहे.