नवी दिल्ली – प्रगत तंत्रज्ञानामुळे उद्योगांचे स्वरुप बदलले आहे. अनेक सुविधा आता आपल्या मोबाईलवरील एका क्लिकमध्ये मिळत आहेत. याआधी घर, चारचाकी वाहन भाड्याने मिळत होते. आता बाईकसह ड्रायव्हर देखील भाड्याने मिळणार आहे. बाईक टॅक्सी सेवा कंपनी रॅपीडोने देशातील सहा शहरांमध्ये ही सुविधा सुरू केली आहे. यामुळे अनेकांना रोजगार मिळाले आहे.
बेंगळुरू, दिल्ली एनसीआर, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि जयपूर इथं रॅपिडो भाडे सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. तर काही दिवसांनी मुंबईमध्येही सेवा सुरू करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे रोजागर उपलब्ध होणार आहे. या बाईकमुळे प्रवास भाडे कमी होऊन ६ रुपये पर किमीवर येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या खास सुविधेमध्ये एक तास, दोन तास, तीन तास, चार तास आणि सहा तासांचं पॅकेज आहे. यामध्ये बाईकची बुकिंग केल्यानंतर तुम्हाला एक ‘कॅप्टन’ म्हणजेच रॅपिडो ड्रायव्हर पार्टनर देखील मिळेल जो सतत तुमच्याबरोबर राहील आणि तुम्ही त्याला तिथे जायचं असेल तिथे घेऊन जाईल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही सेवा खासकरून अशा ग्राहकांसाठी आहे जे दिवसभर कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात. पहिल्या राईडवर ५० टक्के सूट मिळणार आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये ग्राहकाला वारंवार बुकिंग करण्याची गरज नाही. दिवसातून एकदा बुक केलं तर कॅप्टन त्यांच्या सेवेसाठी तयार असणार आहे.