पुणे – जमिनीची मिळकत पत्रिका अर्थात प्रॉपर्टी कार्ड आता जमीनधारकांना मोबाइल ऍपवर लवकरच उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यात ही सुविधा मुंबई शहरात उपलब्ध झाली आहे.
उर्वरित जिल्ह्यांत लवकरच ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. हे ऍप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होणार आहे. याद्वारे जमिनीचा नकाशा, सिटी सर्व्हे क्रमांक, जमिनीचे क्षेत्र आणि प्रकार, करनिर्धारणा तसेच जमीनधारकाची माहिती कळेल.
भूमि अभिलेख विभागाने प्रॉपर्टी कार्ड संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. ज्याप्रमाणे सात-बारा उतारा ऑनलाइन पाहता येतो, त्याच धर्तीवर जमिनीच्या मालमत्तेचा पुरावा असलेले प्रॉपर्टी कार्ड मोबाइल ऍपवर उपलब्ध होणार आहे.