Vidhan Sabha Elections 2024 । Manoj Jarange – महाराष्ट्रातील बहुप्रतीक्षित विधानसभा निवडणुकीची घोषणा अखेर मंगळवारी झाली. त्यानुसार, २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया होईल. तर, २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर करण्यात येईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केल्याने महासंग्रामाचे रणशिंग फुंकले गेले आहे.
त्यामुळे पुढील महिनाभर रंगतदार राजकीय आतषबाजी होईल. त्यातून दिवाळीतही जोरदार राजकीय फटाके फुटतील. निवडणूक जाहीर होताच आचारसंहिताही लागू झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुकांची घोषणा केली.
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठीची अधिसूचना २२ ऑक्टोबरला जारी केली जाईल. त्या दिवसापासून उमेदवार त्यांचे अर्ज दाखल करू शकतील. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २९ ऑक्टोबर आहे. त्या अर्जांची छाननी ३० ऑक्टोबरला होईल. उमेदवारी अर्ज ४ नोव्हेंबरपर्यंत मागे घेता येऊ शकतील.
महाराष्ट्रात मागील ५ वर्षांत मोठ्या आणि नाट्यमय राजकीय उलथापालथी घडल्या. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीला शब्दश: राजकीय महासंग्रामाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यातून महाराष्ट्राचा मतदारराजा सत्तेसाठी कुणाला कौल देणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष असेल.
मात्र, निडणुकीचं बिगुल वाजताच मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र सरकारसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी फडणवीस आणि सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे.
यावेळी ते म्हणाले, “मराठा आरक्षणाचा मुडदा पाडण्याचं काम सरकार करणार नाही असं वाटत होतं. पण सरकारने आम्हाला फसवलं. आंदोलन आणि मराठा समाज एक ठेवायचा नाही, त्यांना आरक्षण द्यायचं नाही.
मराठा समाज बलाढ्य आहे, त्यांना मोठं होऊ द्यायचं नाही. मराठ्यांची पोरं भिकारी राहिले पाहिजे. ते पुढे येता कामा नये हे वचन देवेंद्र फडणवीस यांनी उचललं होतं. सत्ता मात्र मराठ्यांनी दिली’, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
पुढे म्हणाले की, ‘सत्तेचा गैरवापर करून फडणवीस यांनी काम केलं आणि मराठ्यांची मुलं भिकारी झाली पाहिजे या तत्त्वाने द्वेषाने आणि आकसाने फडणवीस मराठ्यांशी वागले. त्यांनी त्यांची चाल यशस्वी केली. निर्णय घ्यायचं त्यांच्या हातात होते. सत्ता त्यांच्या हातात होती. मराठ्यांना डिवचण्याचं काम केलं.
ओबीसीमध्ये नव्या १७ जाती घातल्या पण मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. ही खुन्नस फडणवीस यांनी दिली. हे मराठ्यांना आरक्षण देणार नाही हे लक्षात आलं होतं. कारण आम्ही एवढे गाफील नाही. आम्हाला कळत होतं. पण क्षत्रियांचा धर्म असतो शेवटच्या क्षणापर्यंत विश्वास ठेवा. काहीही घडू शकतो.
या भूमिकेतून आम्ही विश्वास ठेवला. कारण लढाईत शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकतं. पण शेवटी त्यांनी करायचं तेच केलं. त्यांच्या पोटात जे बरबटलेले विचार होते ते बाहेर आणलेच. शेवटी आचारसंहिता करून मराठ्यांचं वाटोळं केलं. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांचा सुपडा साफ केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही”, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.