अब होगा न्याय ! कॉंग्रेसची निवडणूक घोषणा

नवी दिल्ली – कॉंग्रेसने या निवडणुकीतील आपली घोषणा निश्‍चीत केली आहे. अब होगा न्याय अशी कॉंग्रेसची घोषणा आहे. मोदी सरकारच्या काळात देशातील जनतेवर अन्याय झाल्याची भावना आहे त्याला प्रतिसाद म्हणून कॉंग्रेसने ही घोषणा दिली आहे. त्यात कॉंग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यातील न्याय या योजनेच्या प्रचाराचाही अर्थ पक्षाला अभिप्रेत आहे. गरीबांना दर वर्षी 72 हजार रूपयांचे किमान वेतन देण्याची योजना कॉंग्रेसने न्याय नावाने जाहीर केली आहे. या मार्फत आम्ही लोकांना न्याय देऊ असे पक्षाचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी सांगितले.

ते म्हणाले की आज देशातील सामान्य जनता न्यायासाठी ओरडत आहे, त्यांना तो मोदी सरकारच्या काळात नाकारला गेला आहे. आम्ही या निवडणूक प्रचारात लोकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत असे शर्मा यांनी सांगितले. पक्षाच्या निवडणूक घोषणेबरोबरच पक्षाचे अन्य प्रचार साहित्य आणि ऑडिओ व्हीडीओ क्‍लीपसही आज प्रकाशित करण्यात आल्या. ते म्हणाले की या साऱ्या प्रचार साहित्याला निवडणूक आयोगाची अनुमती घेण्यात आली आहे.
कॉंग्रेसच्या या गीतांमध्ये जावेद अख्तर यांनी लिहीलेल्या मै हुँ तो हिंदुस्तान हुँ या गाण्याचा समावेश आहे. पक्षाच्या या प्रचार फितीचे दिग्दर्शन निखील आडवाणी यांनी केले आहे. राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि पक्षाच्या कोअर कमिटीने हे पक्षाचे प्रचार साहित्य तयार केले आहे असेही शर्मा यांनी सांगितले. प्रसार माध्यमांमधील प्रसिद्धीसाठी कॉंग्रेसने पर्सेप्ट एजन्सीची नियुक्ती केली आहे. सर्व माध्यमांमधून पक्षाचा हा प्रचार केला जाणार आहे असे ते म्हणाले. पक्षाने प्रादेशिक भाषांतील प्रचारासाठीही वेगळी रणनिती अवलंबी असल्याचे त्यांनी सांगितले. सहा प्रादेशिक भाषांमध्ये पक्षाची प्रचार यंत्रणा इलेक्‍ट्रॉनिक आणि न्युज पेपरच्या माध्यमातून राबवली जाणार आहे असे ते म्हणाले. कॉंग्रेसने मोदी सरकारच्या विविध दाव्यांचा फोलपणा दाखवणाऱ्याही काही व्हिडीओ चित्रफीती विविध भाषांमधून तयार केल्या आहेत. पैशा अभावी आम्ही भाजपच्या प्रसिद्धी मोहीमेचा सामना करू शकत नाही असे आनंद शर्मा यांनी यावेळी मान्य केले ते म्हणाले की भाजपकडे प्रचंड पैसा असून ते देशातला सर्वात मोठे जाहीरातदार आहेत. पैशाच्या बाबतीत त्यांच्याशी आमची तुलना होऊ शकत नाही. पण सत्याच्या बाबतीत आमची बाजू वरचढ असून आम्ही त्यांना त्या आधारावर निश्‍चीत मात देऊ असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.