आता प्रणवदांच्या पुत्राबाबत राजकीय अफवांना उधाण

कोलकता  -माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांचे पुत्र आणि कॉंग्रेस नेते अभिजीत मुखर्जी पक्षबदलाच्या मूडमध्ये असल्याच्या राजकीय अफवांना आता उधाण आले आहे. मात्र, त्यांनी तातडीने त्या अफवा फेटाळून लावत कॉंग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

माजी खासदार असणारे मुखर्जी तृणमूल कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याच्या बातम्या काही वृत्तपत्रांनी आणि वाहिन्यांनी दिल्या. मात्र, त्या बातम्या खोट्या असल्याचे मुखर्जी यांनी म्हटले. मित्र जितीन प्रसाद यांच्याप्रमाणे कॉंग्रेस सोडून जाणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

मुखर्जी यांचे चांगले मित्र असणाऱ्या प्रसाद यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. ती घडामोड ताजी असतानाच तृणमूलच्या काही नेत्यांनी मुखर्जी यांची भेट घेतली. त्यामुळे मुखर्जी यांच्याविषयी चर्चा सुरू झाल्या. त्यापार्श्‍वभूमीवर, प्रतिक्रिया देताना मुखर्जी यांनी केवळ दुसऱ्या पक्षातील मित्र भेटायला आल्याने कॉंग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा करणे चुकीचे असल्याचे म्हटले.

पश्‍चिम बंगालमध्ये नुकतीच विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत कॉंग्रेसने मुखर्जी यांच्यावर प्रचार समितीच्या अध्यक्षपदासारखी महत्वाची जबाबदारी सोपवली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.