पालिकेत आता पाणीपुरवठा समिती

लवकरच सर्वसाधारण सभेसमोर प्रस्ताव; आयुक्तांची माहिती

पिंपरी -पिंपरी-चिंचवड शहरात सध्या विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी अडचणीत आले आहेत. त्यावर उपाय म्हणून महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा विषय समितीची स्थापना करण्यात येणार आहे. या समितीच्या माध्यमातून पाणीपुरवठा विभागावर नियंत्रण ठेवले जाणार असल्याची माहिती, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याबाबतीत आयुक्तांनी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. पुढील सहा महिन्यात विस्कळीत पाणीपुरवठ्यावर नियंत्रण आणून समन्यायी पद्धतीने संपूर्ण शहरात पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यातीलच एक उपाय म्हणून महापालिकेमध्ये पाणीपुरवठा विषय समितीची स्थापना करण्यात येणार आहे. या समितीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी पाणीपुरवठ्यांच्या प्रश्‍नांवर तत्काळ निर्णय घेऊ शकतील.

तसेच नवे प्रकल्प, पाणी पुरवठ्याचा आढावा, नियंत्रण, मॉनिटरिंग, सुपरव्हिजनही या समितीच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे आयुक्त म्हणाले. समितीची रुपरेखा ठरवून पुढील महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर या समितीच्या निर्मितीचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतर या समितीची निर्मिती केली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.