आता बाकड्यांवरील फरश्‍यांचीही चोरी

जंगली महाराज रस्त्यावरील प्रकार : पालिका कर्मचारी असल्याचा बनाव

पुणे – लोखंडी जाळ्या, बाकडे, स्टीलचे बॅरिकेड, पथदिव्यांचे फ्यूज अशा साहित्य चोरीचे प्रकार तुम्ही वाचले असतील. मात्र, आता भुरट्या चोरांकडून चक्क रस्त्याच्या कडेला बसण्यासाठी तयार केलेल्या सिमेंट बाकांवरील कडप्पा फरशांवर हात साफ केला आहे.

ही घटना स्मार्ट स्ट्रीटअंतर्गत पालिकेने विकसित केलेल्या जंगली महाराज रस्त्यावर संभाजी उद्यान परिसरात घडली. चोरी सुरू असताना, येथील काही सुरक्षा रक्षकांनी चोरांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, “आम्ही महापालिकेचे कर्मचारी आहोत,’ असे सांगत या फरश्‍या लंपास करण्यात आल्या आहेत. तर संभाजी उद्यान पोलीस चौकी या जागेपासून अवघ्या 200 मीटर अंतरावर आहे.

जंगली महाराज रस्त्यावर स्वतंत्र पदपथ, सायकल ट्रॅक तसेच जागोजागी लहान उद्याने आहेत. याशिवाय बसण्यासाठी सिमेंटची आकर्षक बाकडेही असून त्यावर कडप्पा फरशी तसेच त्याला आधाराला काही ठिकाणी लोखंडी जाळ्या आणि पट्ट्या बसविण्यात आल्या आहेत. शहरातील मध्यवर्ती रस्ता असल्याने मध्यरात्रीपर्यंत येथे वाहनांची वर्दळ असते. पण, तरीही चोरांनी या फरशांवर हात साफ केले आहेत.

स्ट्रीट फर्निचर ठरतेय लक्ष
गेल्या काही वर्षांत महापालिकेने नागरिकांच्या सुविधेसाठी बसविलेले स्ट्रीट फर्निचर भुरट्या चोरांचे लक्ष्य ठरत आहे. अशा घटनांमध्ये वारंवार वाढ होत असून पोलिसी तपासाचा ससेमिरा नको म्हणून महापालिका अधिकारीही या प्रकाराच्या तक्रारींची साधी दखलही घेत नाहीत. मात्र, यामुळे सर्वासामान्यांनी नियमितपणे भरलेल्या कराच्या पैशांची उधळपट्टी होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)