नवीन वाहनांना आता ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट

वाहन सुरक्षेच्या दृष्टीने परिवहन आयुक्‍तांचे आदेश

पुणे – वाहन सुरक्षेच्या दृष्टीने केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाने वाहनांना “हाय सिक्‍युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ बसवण्याचा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिल 2019 पासून नव्या वाहनांबाबत “एचएसआरपी’ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानुसार वाहन उत्पादकांच्या मार्फत या नंबर प्लेट नवीन वाहनांना बसवण्यात येणार आहेत. वाहनांना या नंबरप्लेट लावल्यानंतरच याची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये होणार आहे.

केंद्रीय मोटारवाहन नियम 1989 च्या नियम 50 अनुसार वाहनांवर हाय सिक्‍युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसवण्यात येणार आहे. येत्या 1 एप्रिल पासून उत्पादित होणाऱ्या सर्व वाहनांबा “एचएसआरपी’ बसवण्यात येणार आहे. या पद्धतीची नंबरप्लेट असल्याची खातरजमा करूनच वाहनांची नोंदणी करण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने दिले आहेत.

अशी असेल नवीन नंबरप्लेट
या “हाय सिक्‍युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट्‌स’ अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनवण्यात येणार असून त्या “टॅम्परप्रूफ’ असणार आहेत. या नंबर प्लेटवर निळ्या रंगाच्या चक्राचे “थ्रीडी’ होलोग्राम असणार आहे. त्याचबरोबर वाहन क्रमांकाच्या खाली तिरप्या ओळीत “इंडिया’ असे लिहीलेले असेल. “हॉट स्टॅम्पिंग’ आणि “स्नॅप लॉक’ ही या प्लेटची वैशिष्टये आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक पोलीसांनी बारकोड स्कॅन केल्यास वाहनांची पूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.