आग्रा (उत्तर प्रदेश) : अलाहाबादचे नामांतर प्रयागराज, फैजाबाद बनले अयोध्या, मुघलसरायचे नाव बदलून दीनदयाल उपाध्याय नगर आणि आता आग्र्याच्या मुघल म्युझियमचे नाव छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम केले जाणार आहे. उत्तर प्रदेशात नामांतराचे राजकारण पुन्हा सुरु झाले आहे. यावेळी योगी आदित्यनाथ सरकारने आग्र्यात बनत असलेल्या मुघल म्युझियमचे नाव बदलले आहे. आता हे म्युझियम छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम नावाने ओळखले जाणार आहे. या विषयीची माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करून दिली आहे.
आगरा में निर्माणाधीन म्यूजियम को छत्रपति शिवाजी महाराज के नाम से जाना जाएगा।
आपके नए उत्तर प्रदेश में गुलामी की मानसिकता के प्रतीक चिन्हों का कोई स्थान नहीं।
हम सबके नायक शिवाजी महाराज हैं।
जय हिन्द, जय भारत।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) September 14, 2020
ताजमहलमुळे जगभरात प्रसिद्ध असलेल्या आग्र्यात सध्या मुघल म्युझियमचे बांधकाम होत आहे. परंतु योगी सरकारने आता या म्युझियमचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हे मुघल म्युझियम आता मुघलांना आव्हान देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखले जाणार आहे. आग्र्यातील विकास कामांचा आढावा घेताना स्वत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केली. या निर्णयाची माहिती योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरवरुन दिली. त्यांनी लिहिले आहे की, “आग्रामध्ये सुरु असलेलं म्यूझियम आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखले जाईल. तुमच्या नव्या उत्तर प्रदेशात गुलामीच्या मानसिकतेच्या प्रतिकांचं कोणतंही स्थाना नाही. आपल्या सगळ्यांचे नायक शिवाजी महाराज आहेत. जय हिंद, जय भारत.”
ताजमहलच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारावर बनत असलेल्या मुघल म्युझियमला 2015 मध्ये अखिलेश सरकारच्या कार्यकाळात मंजुरी मिळाली आहे. पण आता या म्युझियमचे नाव बदलून योगी आदित्यनाथ यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. एकीकडे त्यांनी हिंदुत्त्वाचे राजकारण आणखी मजबूत केले आहे, तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव म्युझियमला देऊन शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
यूपी सरकारने या म्युझियमद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वैभव संपूर्ण जगभरात पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सरकारने पर्यटन विभागाच्या अधिकारिऱ्याच्या माध्यमातून म्युझियममध्ये मराठा साम्राज्याच्या तमाम वस्तू प्रदर्शनाला ठेवण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आग्र्यात बनणाऱ्या या म्युझियममध्ये मुघलकालीन वस्तु आणि दस्तऐवज प्रदर्शित केले जातील, अशी माहिती पर्यटन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. याशिवाय पर्यटकांसाठी इथे विशेष सुविधांची व्यवस्था करण्यासही सांगितले आहे.