नवी दिल्ली – विविध बैठकांमुळे राजकारण ढवळून निघाले असतानाच कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही 24 जूनला एक बैठक बोलावली आहे. त्यामध्ये पक्षाचे सरचिटणीस आणि प्रदेश शाखांचे प्रभारी सहभागी होणार आहेत. त्यामध्ये मोदी सरकारच्या विरोधात देशव्यापी निदर्शने करण्याच्या रणनीतीवर चर्चा होणार असल्याचे समजते.
सोनियांनी बोलावलेल्या व्हर्च्युअल बैठकीत मोदी सरकारला घेरण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध मुद्द्यांवर चर्चा होईल. सरकारचे अपयश जनतेपर्यंत पोहचवण्याचा कॉंग्रेसचा इरादा असल्याचे पक्षाच्या सुत्रांनी सूचित केले.
प्रामुख्याने इंधन दरवाढीवरून निदर्शने छेडण्याची कॉंग्रेसची योजना आहे. त्यामुळे त्या मुद्द्याबरोबरच करोना संकट, राजकीय स्थिती, अर्थव्यवस्था, शेतकरी आंदोलनावरही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
करोना संकटाची हाताळणी, लसीकरणाची संथगती आदींवरून कॉंग्रेस सातत्याने सरकारला लक्ष्य करत आहे. पुढील महिन्यापासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होईल. त्यामुळेही सोनियांनी बोलावलेल्या बैठकीला महत्व आहे.
मोदी सरकारविरोधात आणि विशेषत: भाजपच्या विरोधात एकवटण्याच्या हालचाली इतर विरोधी पक्षांनी सुरू केल्या आहेत. त्यामुळेही कॉंग्रेसची बैठक राजकीय उत्सुकता वाढवणारी ठरणार आहे.