135 व्या वर्धापनदिनानिमित्ताने शहर कॉंग्रेसने बांधला चंग
पुणे – नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून आगामी महापालिका निवडणुकीत महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा लावणार असा चंग पक्षाच्या 135 व्या वर्धापन दिनानिमित्ताने शहर कॉंग्रसने बांधला आहे.
आगामी 2022 च्या महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भात शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी गुरुवारी कॉंग्रेस भवन येथे बैठक घेतली. यामध्ये प्रभाग निहाय निरीक्षक नेमून पक्षाचे नेते, पदाधिकारी बैठका घेणार आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढताना कॉंग्रेस पक्ष बरोबरीचा भागीदार असेल, असे बागवे यांनी स्पष्ट केले.
कार्यकर्त्यांनी गटातटाचा विचार न करता पक्षाचा उमेदवार या नात्याने पक्षाचे काम करायचे आहे, असेही नमूद केले. यावेळी शहरातील प्रदेश पदाधिकारी, आजी-माजी आमदार, आजी-माजी नगरसेवक, सेलचे अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षाच्या 135 व्या वर्धापनदिनी पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने अनेक कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 26 डिसेंबर रोजी पक्षाच्या वाटचालीचे साक्षीदार असलेल्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन, ध्वनिचित्रफीतीच्या माध्यमातून कॉंग्रेसचे योगदान प्रक्षेपित करण्यात येणार आहे. याचे उद्घाटन राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या हस्ते होणार आहे.