आता शहरावर ड्रोनची नजर

शहर पोलीस उपअधीक्षक मिटके यांची माहिती

नगर  -करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशभर संचारबंदी लागू केली आहे. तरी नागरिक करोनाचा धोका गांभीर्याने घेत नसल्याने विनाकारण घराबाहेर पडत असून, दुचाकीवर शहरातून मुक्त संचार करत आहे. त्यामुळे शहर पोलीस अशा नागरिकांवर ड्रोनद्वारे नजर ठेवणार आहे. सध्या एक ड्रोन कॅमेरा असला तरी यामध्ये लवकरच वाढ करण्यात येणार असल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिली.

जिल्ह्यात करोनाचे आठ रुग्ण आढळले आहे. दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशा सुचना प्रशासन वेळोवेळी करत आहेत. तरी काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळून येत आहे. तीन दिवसांपूर्वी नागरिकांनी भाजी खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र सर्वांनी पाहिले. पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या, संचारबंदीचे नियम मोडणाऱ्यावर कलम 188 अन्वये गुन्हे दाखल केले आहे. परंतु, काही टवाळखोर पोलिसांची नजर चुकवून घराबाहेर पडत आहे. अशा नागरिकांवर आता ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. ड्रोनच्या नजरेत आलेल्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

शहरातील गर्दीच्या ठिकाणी या ड्रोनची नजर असणार आहे. सावेडी, मुकुंदनगर, भिंगार परिसर, माळीवाडा, केडगाव आदी भागात ड्रोनची नजर असणार आहे. सध्या एक ड्रोन शहर पोलिसांना उपलब्ध झाला आहे. परंतु, गरजेनुसार यात वाढ केली जाणार आहे. नागरिकांनी भाजी, किराणा खरेदीसाठी गर्दी करु नये, तसेच विनाकारण रस्त्यावर फिरु नये असे, आवाहन मिटके यांनी केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.