“दिव्यांगसाथी’ संकेतस्थळाचा शुभारंभ ः प्रत्येक जिल्ह्यात संकेतस्थळ सुरू करण्याबाबत विचार
मुंबई : दिव्यांग व्यक्तींची ऑनलाईन नोंदणी, प्रमाणपत्र याचबरोबर दिव्यांगांसाठी असलेल्या विशेष योजनांचा लाभ मिळवून देणे सुकर करण्याच्या उद्देशाने “दिव्यांगसाथी’ या विशेष संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. यामुळे योजनांचा लाभ घेताना येणा-या अनेक अडचणींपासून दिव्यांग व्यक्तीची सुटका होणार आहे. या संकेतस्थळावर त्यांना घर बसल्या योजनांचा फायदा मिळण्यास मदत मिळेल. या संकेतस्थळाचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अशा प्रकारचे संकेतस्थळ राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असावे या दृष्टिकोनातून विभागाला सूचना करण्यात येतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
या संकेतस्थळावरून जिल्ह्यातील सर्व गावातील ग्रामसेवकांमार्फत येत्या एक महिन्याच्या आत दिव्यांग व्यक्तींची माहिती भरण्यात येईल. यामध्ये प्रामुख्याने त्यांचे आधार कार्ड, बॅंक खाते, दिव्यांग प्रमाणपत्र आदी बाबींचा समावेश असेल. यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजीव येडके हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी दिली.
या संकेतस्थळावरून जिल्ह्यातील दिव्यांगांची नोंदणी करून, प्रमाणपत्र प्राप्त लाभार्थ्यांना 3 टक्के खर्च योजना, विमा, पेन्शन, एसटी-रेल्वे पास इत्यादी योजनांचा लाभ मिळवून देणे, पात्र लाभार्थींना स्वावलंबन कार्ड मिळवून देणे, तपासणी व ऑनलाईन नोंदणी, तसेच आरोग्यविषयक सेवा मिळवून देणे या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींची नोंदणी करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे संकेतस्थळ असावे अशी इच्छा धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली होती. त्याला प्रतिसाद देत त्यासाठी सर्वात प्रथम त्यांच्याच बीड जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन हे संकेतस्थळ आकाराला आणले आहे.
दरम्यान जिल्ह्यातील ग्रामीणसह शहरी भागातील सर्व दिव्यांग व्यक्तींची नोंद घ्यावी, सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत विभागाची प्रत्येक योजना पोहोचविण्यासाठी मदत व्हावी असे चोख नियोजन करून हा उपक्रम राबविण्यात यावा, अशा सूचना मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.