आता ग्रामीण भागातील बांधकाम प्रक्रिया सुलभ : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

3,200 चौ. फुटापर्यंत ग्रामपंचायत परवानगी देणार

पुणे – राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे 3 हजार 200 चौरस फुटापर्यंतच्या बांधकामांना आता नगररचनाकाराच्या परवानगीची गरज लागणार नाही. परवानाधारक अभियंत्याकडून आवश्‍यक त्या कागदपत्रासह अर्ज ग्रामपंचायतीमध्ये द्यावा लागणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

ग्रामीण भागात नागरिक विविध निवासी, व्यावसायिक किंवा इतर बांधकामे करीत असतात. बहुतांश बांधकामे ही छोट्या क्षेत्रफळाची असतात. पण प्रत्येक बांधकामासाठी आतापर्यंत नगररचनाकाराची परवानगी घेणे बंधनकारक होते. त्यामुळे कमी क्षेत्रफळाच्या छोट्या बांधकामासाठीही ग्रामस्थांना तालुका किंवा जिल्हास्तरावर नगररचनाकाराकडे हेलपाटे मारावे लागत असत.

पण आता घेण्यात आलेल्या निर्णयामुळे ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार असून त्यांची वणवण थांबणार आहे. तथापी 3 हजार 200 स्क्वेअर फुटावरील भुखंडावरील बांधकामांसाठी मात्र नगररचनाकाराची परवानगी आवश्‍यक असेल. तसेच रत्नागिरी जिल्ह्याची प्रादेशिक योजना बनविण्याचे काम अद्याप सुरु असल्याने सध्या हा नवीन निर्णय रत्नागिरी जिल्ह्यासाठी लागू होणार नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

अडवणूक थांबणार
1 हजार 600 ते 3 हजार 200 , चौरस फुटापर्यंतच्या भुखंडावरील बांधकामासाठी ग्रामस्थाने युनिफाइड डिसीआरनुसार बांधकामाची परवानगी मागण्यासाठी ग्रामपंचायतीकडे परवानाधारक अभियंत्याद्वारे प्रमाणित आणि साक्षांकीत आवश्‍यक कागदपत्रांसह अर्ज केल्यानंतर ग्रामपंचायत संबंधीत ग्रामस्थास किती विकास शुल्क भरायचे याची माहिती 10 दिवसात कळवेल. ग्रामस्थाने ते शुल्क भरल्यानंतर ग्रामपंचायत 10 दिवसात कोणत्याही छाननीशिवाय बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र देईल. ग्रामपंचायत पातळीवर त्याची अडवणूक होऊ नये, यासाठी या पातळीवरील प्रक्रियाही खूप सोपी करण्यात आली आहे, असे ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

प्रमाणपत्राची आवश्‍यकता नाही
सुमारे 1 हजार 600 चौरस फुटापर्यंतच्या भूखंडावरील बांधकामासाठी ग्रामस्थास मालकी कागदपत्रे, मोजणी नकाशा बिलिंडग प्लॅन आणि हे सर्व प्लॅन युनिफाइड डीसीआरनुसार असल्याचे परवानाधारक अभियंत्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे ग्रामपंचायतीस फक्त सादर करावी लागणार असून आवश्‍यक विकास शुल्क भरावे लागेल. ही पूर्तता केल्यानंतर ग्रामस्थास थेट बांधकाम सुरू करता येईल. या मर्यादेतील बांधकामास ग्रामपंचायतीच्या बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्राची आवश्‍यकता लागणार नाही

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.