चर्चेसाठी पाच गटांची केली स्थापना
नवी दिल्ली – कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची रिक्त जागा त्वरीत भरा अशी पक्षातूनच मागणी झाल्याने प्रत्येक राज्यातील पक्षाच्या प्रमुखांशी आणि विधीमंडळ कॉंग्रेस नेत्यांशी चर्चा करून आणि अन्य नेत्यांशी सल्लामसलत करून पक्षाध्यक्ष निवड करण्याचा निर्णय आजच्या कार्यकारीणीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी त्यांनी पाच प्रादेशिक गटांचीही स्थापना करण्यात आली.
त्यानुसार ईशान्येकडील राज्ये, पुर्वेकडील राज्ये, उत्तर भारत, पश्चिम भारत आणि दक्षिण भारत असे पाच प्रादेशिक गट स्थापन करण्यात आले. या गटांनी संबंधीत राज्यातील कॉंग्रेस नेत्यांशी या बाबत चर्चा केली. आज झालेल्या पक्षाच्या महत्वाच्या बैठकीला कार्यकारणी सदस्यांसह अनेक राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, विधीमंडळ पक्षाचे नेते आणि पक्षाच्या अन्य संघटनांचे प्रमुख उपस्थित होते.
पक्षाने ज्या समित्या आज नेमल्या, त्यात उत्तर भारतासाठीच्या समितीचे प्रमुख पद अरूण यादव यांच्याकडे देण्यात आले तर या समितीत अंबिका सोनी, अहमद पटेल यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला होता. पुर्व भारतासाठीच्या गटात सोनिया गांधी, के. सी. वेणुगोपाल यांचा समावेश करण्यात होता, या गटाचे प्रमुखपद सुष्मिता देव यांच्याकडे देण्यात आले होता. उत्तर भारतासाठीच्या गटाचे नेतृत्व रजनी पाटील यांच्याकडे देण्यात आले होत्या. त्यांच्या समितीत प्रियांका गांधी,पी चिदंबरम, यांचा समावेश होता. पश्चिम भारतासाठीच्या गटात राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, गुलामनबी आझाद, ए. के ऍन्टोनी, मोतीलाल व्होरा यांचा समावेश करण्यात आला. या गटाचे प्रमुखपद गौरव गोगोई यांच्याकडे देण्यात आले होते.
दक्षिण भारतासाठीच्या गटाचे नेतृत्व राजीव सातव यांच्याकडे देण्यात आले होते, त्यात मनमोहनसिंग, आनंद शर्मा मुकुल वासनीक यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला होता. या समित्यांच्या बैठका पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयातच लगेच सुरू करण्यात आल्या आणि ही प्रक्रिया पार पाडण्यात आली. कालही राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पक्षाच्या नेत्यांची या संबंधात एक बैठक झाली होती.
त्यात पक्षाध्यक्ष त्वरीत निवडण्याची गरज अन्य नेत्यांनी राहुल गांधी यांच्या कानावर घातली. पक्षाच्या वतीने गुरूद्वारा रकाबगंज येथील वॉर रूममध्येही एक बैठक झाली त्यात केंद्र सरकारने कलम 370 रद्द करून काश्मीर हा केंद्र शासित प्रदेश बनवण्याच्या निर्णयावर चर्चा झाली असे समजते. दरम्यानच्या काळात अहमद पटेल, ए. के. ऍन्टोनी, के. सी. वेणुगोपाल या नेत्यांनी शुक्रवारी सोनिया गांधी यांच्याशी पक्षातील सद्य स्थितीबाबत चर्चा केली.