वर्षातील सर्वांत मोठा मुहूर्त हुकला
पुणे – हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि वर्षातील सर्वांत मोठा सण असलेल्या गुढीपाडव्याचा मुहूर्त सराफांसाठी मात्र हुकला. आता त्यांनी अक्षय्यतृतीयेवर भिस्त ठेवली असून, त्यांना आता 26 एप्रिलपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात. दरवर्षी नववर्षाचे स्वागत दागिन्यांची खरेदीने करण्यासाठी पुण्यातील सराफ बाजारात नागरिकांची झुंबड उडाल्याचे दिसून येत. यंदा मात्र पुण्यातील सराफ बाजार ओस पडला आहे. त्यामुळे सोने-चांदीच्या दागिने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी अक्षय्यतृतीयेला हे चित्र बदलेल, अशी अपेक्षाही त्यांना आहे.
दरवर्षी गुढीपाढव्याचा मुहूर्त साधून शेकडो नागरिक सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी करत असतात. यंदा मात्र असे होताना दिसत नाही, कारण देशात करोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव पाहता जीवनावश्यक वस्तू वगळता, इतर सर्व बाजारपेठा सक्तीने बंद ठेवल्या आहेत. पुढील तीन आठवडे या बाजारपेठा बंद राहणार आहेत. परिणामी सोन्याचे भाव वाढले आहेत. तसेच अभ्यासकांनी आगामी काळात अर्थव्यवस्थेवर बिकट परिणाम होण्याची शक्यता वर्तविली आहे. याचा परिणाम सोने-चांदीच्या दागिने व्यवसायालाही बसला असून, नागरिकांनी या वस्तूंच्या खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे साहजिकच सराफ बाजारात चिंतेचे वातावरण आहे. मात्र, या स्थितीतही दागिने व्यावसायिकांना एक आशेचा किरण आहे. तो म्हणजे अक्षय्यतृतीया. आगामी अक्षय्यतृतीयेला गुढीपाडव्याची कमतरता भरून निघेल आणि त्यावेळी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.
लॉकडाऊनमुळे नागरिकाना खरेदीसाठी पर्याय म्हणून अनेक सराफ व्यावसायिकांनी संकेतस्थळाचा पर्याय दिला होता. गेल्या काही दिवसांमध्ये या संकेस्थळांना अनेक नागरिकांनी भेट दिली. मात्र, दागिन्यांची वेळेवर डिलिव्हरी देण्याबाबत असलेली अपरिहार्यता आणि सोन्याची भाववाढ यामुळे खरेदीसाठी अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला.
– सिद्धार्थ शहा, चंदुकाका सराफ ज्वेलर्स