नवी दिल्ली – पंजाब, पश्चिम राजस्थान व काश्मीर येथे मान्सूनचा पाऊस पडल्यामुळे आता समग्र देशात मान्सूनचा पाऊस चांगला झाला असे म्हणावयास हरकत नाही. पश्चिम राजस्थानात हा पाऊस एक आठवडा लवकरच पडला आहे. पुणे येथील हवामान खात्याने असे भाकित केले आहे की, येत्या 48 तासांत पूर्व उत्तर प्रदेशात तुरळक पाऊस पडेल. उपसागरी बेटांवर, आसाम, प. बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, कोकण, गोवा व कर्नाटकचा किनारा येथे मुसळधार पाऊस पडेल. लखनौ, गोंडा, अलाहाबाद येथे पावसाने उच्चांक मोडला.
महागाई- अमेरिकेतली!
न्यूयॉर्क – जगभर महागाई झाली आहे. अमेरिका हा समृद्ध देश आहे. पण तेथे देखील महागाई आली आहे. त्या महागाईचे स्वरूप अन्य देशापेक्षा वेगळे आहे. फुले, फुलझाडे व फुलांच्या बिया इत्यादी सर्वांच्याच किमती वाढल्यामुळे तेथील घरातच बागा लावणाऱ्या वा कुंड्यांतच फुलझाडे लावू पाहणाऱ्या मंडळींची बरीच पंचाईत झाली आहे. आता तेथे फुले, फुलझाडे, फुलांची बियाणी इत्यादींच्या खरेदीऐवजी पालेभाज्या वा सर्वसाधारण भाज्या यांच्याच लागवडीवर भर दिला जात आहे. बाल्कनीत वा गॅलरीत फुलांच्या कुंड्यांऐवजी विविध भाज्यांच्या वा काही धान्यांच्या लागवडीनेच सुशोभित झालेल्या दिसतात.