नवी दिल्ली – देशात एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार घातला आहे. या लाटेला रोखण्यासाठी सर्व यंत्रणा दिवसरात्र एक करून काम करत आहे. तर दुसरीकडे भाजपच्या मंत्र्यांकडून रोज जावई शोध लावण्यात येत आहेत.
यावरून आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी योगगुरू रामदेव बाबांवर टीका केली आहे. रामदेव बाबांसारखे लोक गोमूत्र, गोबर आणि कोरोनिल काढतात. अॅलिओपॅथीवर संशय घेतात. त्यामुळे आयएमएने रामदेव बाबांना नोटीसा पाठवल्या पाहिजे, असं सांगतानाच गोबर, गोमूत्र आणि रामदेव ही थेरपीच आता बंद करा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.
दरम्यान, रामदेव बाबा यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रामदेव बाबा यांनी करोनावरील ऍलोपॅथी उपचार पद्धतीबाबत अविश्वासार्हता दर्शवली आहे. त्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्रमक भूमिका घेतली आहे. कोविड उपचार पद्धतीमध्ये फॅबीफ्लू आणि स्टेरॉईड्ससह अन्य अँन्टिबायोटिकही फोल ठरल्याचा दावा रामदेव बाबा यांनी केला आहे. त्यांच्या या विधानावर टीका करत नवाब मलिक यांनी मीडियाशी बोलतांना रामदेव बाबावर टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले नवाब मलिक
देशात एकीकडे कोरोनाचं संकट आहे तर दुसरीकडे भाजप नेत्यांकडून गोमूत्र प्यायला सांगितलं जात आहे. रामदेव सारख्यांच्या औषधांच्या उद्घाटनाला केंद्रीय मंत्री जातात. हे नियम आणि कायद्याला धरून नाही. त्याचा आरोग्य मंत्रालयाने विचार केला पाहिजे. ज्या औषधांना वैद्यकीय मान्यता नाही, त्याविरोधात सरकारने कठोर भूमिका घेतली पाहिजे. जे लोक चुकीची माहिती पसरवत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे.