अवंतीपुरा: देशात एकीकडे करोनाचे सावट तिसऱ्या लाटेच्या माध्यमातून उंबरठ्यावर उभे आहे. तर दुसरीकडे देशात दहशतवाद्यांनी आपल्या कारवाया वाढवल्याचे दिसत आहे. पंतप्रधान मोदींनी जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांशी केलेल्या चर्चेच्या एक दिवस अगोदर दहशतवाद्यांनी एका पाठोपाठ तीन हल्ले करून काश्मिर खोरे दणाणून सोडले होते. असाच आणखी एक घात पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी घडवून आणला आहे.
आता पुन्हा एकदा पुलवामा जिल्ह्यातील एका गावात दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या माजी विशेष पोलीस अधिकाऱ्याची घरात घुसूननिर्घृण हत्या केली. या हल्ल्यात त्यांची पत्नी आणि मुलीचाही करुण अंत झाला. यानंतर इथल्या ग्रामस्थांनी एकच संताप व्यक्त केला आहे. तसेच आता वेळ आली असून पाकिस्तानवर ‘आर या पार’चा हल्ला करण्याची मागणी करण्यात येत आहे.
पुलवामा जिल्ह्यातील एका गावात जम्मू-काश्मीर पोलिसांतील माजी विशेष पोलीस अधिकारी फैय्याज अहमद यांची दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात त्यांची पत्नी आणि मुलगी गंभीररित्या जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दोघींचाही मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली. पाणावलेल्या डोळ्यांनी गावकऱ्यांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले.
या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेकडून घेण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे या हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे. श्रीनगर येथील बर्बरशाह भागात दहशतवाद्यांनी शनिवारी सुरक्षादलांवर ग्रेनेड हल्ला केला होता. यामध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. तसेच एका महिलेसह तीन जण जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी येथील सीआरपीएफ आणि पोलिसांच्या एका संयुक्त पथकावर ग्रेनेड हल्ला केला होता.