अलीकडेच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर इलियाना डिक्रुजच्या “बिग बुल’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी झाला आहे. अभिषेक बच्चनची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटात इलियानाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. इलियानाच्या फेव्हरिट लिस्टमध्ये अजय देवगण, अनिस बज्मी, जॉन अब्राहम यांसारख्या बॉलीवूडमधील दिग्गजांच्या नावांचा समावेश आहे.
परंतु गेल्या काही वर्षांमध्ये एका ऑस्ट्रेलियन फोटोग्राफरसोबतच्या खासगी नात्यामुळे इलियानाला चित्रपटांकडे फारसे लक्ष देता येत नव्हते. पण या अडचणीच्या प्रश्नाबाबत ती फारशी बोलत नाही. ती म्हणाली, “बर्फी’ चित्रपटानंतर मी नियमित स्वरूपात चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे. मध्यंतरी, मी दक्षिणेकडील काही चित्रपटांमध्ये व्यस्त होते. पण आता मी पुन्हा हिंदी चित्रपटांकडे वळले आहे.
“बिग बुल’नंतर माझे दोन चित्रपटांचे चित्रीकरण सुरू होत आहे. “रेड’ या चित्रपटाचा रिमेकपट असलेल्या “रेड -2′ मध्येही काम करण्यासंदर्भात माझी बोलणी झालेली आहेत. त्यामुळे मी बॉलीवूडमधून गायब झाली आहे, बाहेर फेकली गेली आहे असे समजण्याचे कारण नाही. मधल्या काळात माझे लक्ष दक्षिणेकडील चित्रपटांकडे वळले होते; पण आता ते चित्रपट मी कमी प्रमाणात स्वीकारत आहे. आता माझे टार्गेट बॉलीवूड आहे, असे ती म्हणते.
रुस्तम, मुबारकां, बादशाहो, रेड यांसारख्या हिट हिंदी चित्रपटांत इलियानाला संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच्या काळात ती दोन नायिका असणाऱ्या चित्रपटांत झळकली होती. पण आता मात्र “बिग बुल’साहित सर्वच चित्रपटांमध्ये इलियाना सोलो हिरॉईन असणार आहे. असं असलं तरी भविष्यात मला दोन नायिका असणाऱ्या चित्रपटांत काम करण्यास काहीच हरकत नाही, असं इलियानाबाई सांगतात!