चेन्नई – मद्रास उच्च न्यायालयाने गुरूवारी आणखी एक तामीळ सुपरस्टार धनुष याची लक्झरी कारच्या आयातीवरील कराला आव्हान देण्यावरून कानउघाडणी केली. याआधी न्यायालयाने सुपरस्टार विजयला फटकारले होते.
धनुषने काही वर्षांपूर्वी परदेशातून महागडी कार आणली. त्या कारच्या आयातीवर सुमारे 60 लाख रूपयांचा एन्ट्री टॅक्स लागू होता. त्या कराची निम्मी रक्कम धनुषने भरली. मात्र, उर्वरित कर रकमेला आव्हान देणारी याचिका त्याने दाखल केली. त्यावरून न्यायालयाने खडे बोल सुनावले. करदात्यांच्या पैशांतून बनणाऱ्या रस्त्यांवरून तुम्ही लक्झरी कार चालवता.
पेट्रोलच्या खरेदीसाठीही सामान्य माणसाला कराची रक्कम द्यावी लागते. मात्र, सामान्य माणूस करांतून सवलत मिळवण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावत नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. तसेच, धनुषला 48 तासांत कराची उर्वरित रक्कम (30 लाख रूपये) भरण्याचा आदेश दिला.
याआधी तशाच प्रकरणात संबंधित न्यायालयाने विजयला तीव्र शब्दांत फटकारले होते. तसेच, त्याला 1 लाख रूपयांचा दंडही ठोठावला होता.