शिरूर : राज्यात २१ व्या पशुगणनेस सोमवारपासून (दि.२५) नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. याच धर्तीवर शिरूर तालुक्यात पशुसंवर्धन विभागाने पशुगणना सुरु केली आहे. ही पशुगणना करण्यासाठी तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाचे शासकीय कर्मचारी आणि खासगी प्रगणक काम करणार आहेत. तालुक्यात एकूण २७ प्रगणक नेमले असून त्यांच्या कामाची पडताळणी आणि सनियंत्रण पशुसंवर्धन विभागाचे ६ पर्यवेक्षक अधिकारी करणार आहेत. या कामासाठी सर्व प्रगणक आणि पर्यवेक्षक यांना तालुका पातळीवर प्रशिक्षण दिले आहे. तसेच भटकी कुत्री, भटक्या गायी, आणि प्रथमच भटका पशुपालक समुदाय (पॅस्टोरल कम्युनिटी), गोशाळा, पांजारपोळातील गोवंशाची अचूक माहिती गोळा केली जाणार आहे.
पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये याचे लक्षणीय योगदान आहे. शासनाला नियोजनासाठी पायाभूत सांख्यिकी माहितीची आवश्यकता असते. अशी पायाभूत माहिती ही पशुगणनेच्या स्वरुपात गोळा केली जाते. ही पशुगणना दर पाच वर्षांनी करण्यात येते.
पशुगणनेच्या माध्यमातून राज्यातील नागरी व ग्रामीण भागातील कुटुंबातौल, कौटुंबिक आणि बिगर कौटुंबिक उपक्रम तसेच संस्था आणि गोशाळा यांच्याकडे असलेल्या आणि राज्यात आढळणाऱ्या पशुधनाच्या १६ प्रजाती (गायवर्गीय, म्हसवर्गीय पशुंसह, मेंढी, शेळी, डुक्कर, घोडा, खेचर, गाढव, कुत्रा, ससा, हत्ती) व कुक्कुट पक्षी (कोंबडे कोंबड्या, बदक, टर्की, क्वेल यांची जातीनिहाय, वयोगट तसेच लिंगनिहाय व उपयोगानुसार आकडेवारी गोळा केली जाणार आहे. सोबतच भटकी कुत्री, भटक्या गाई आणि प्रथमच भटका पशुपालक समुदाय (पैस्टोरल कम्युनिटी), गोशाळा, पांजारपोळातील गोवंशाची देखील माहिती संकलित करण्यात येणार आहे. ही पशुगणना फेब्रुवारी २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
अशा प्रकारे होणार पशुगणनेचा उपयोग..
राज्यातील दुध, अंडी, मांस आणि लोकर उत्पादन यांचा अंदाज करणे. पशुधनाचा लसीकरण कार्यक्रम राबविणे,विविध योजना राबविणे,विविध प्रकारच्या पशुधनाचा शोध घेणे, पशुपैदास गाई व म्हशींची संख्या ठरविणे,पशुवैद्यकिय दवाखान्यांची संख्या ठरविणे, पशुधन कुक्कुटादी पक्षी यांचा वृद्धीदर ठरविणे, पशुधन क्षेत्रातील उदयोन्मुख ट्रेंड, नमुने आणि आव्हाने ओळखण्यात मदत करते.
विविध प्रदेश आणि समुदायांना त्यांच्या पशुधन लोकसंख्येवर आणि गरजांवर आधारित निधी, पायाभूत सुविधा आणि सेवा यासारख्या संसाधनांचे वाटप करण्यास मदत करते.केंद्र आणि राज्य शासनाने सर्व पशुधनाला बिल्ला मारने बंधनकारक केले असून पशुगणानेच्या माध्यमातून ही माहिती शासनाला कळविण्यात येणार आहे. तरीही सर्व पशुपालकांनी प्रगणकांना पशुगणनेसाठी लागणारी अचूक व संपूर्ण माहिती देऊन शासनास सहकार्य करावे असे आवाहन शिरूर तालुका पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
देशात १९१९-२० मध्ये पशुगणनेस सुरुवात झाली. तेव्हापासून दर ५ वर्षांनी पशुगणना घेण्यात येत आहे. पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये अधिक सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने २० व्या पशुगणनेमध्ये जातनिहाय प्रजातींचे वय, लिंग व उपयोगानुसार गणना केली आहे. विविध पशुधन प्रजातींची जात, वय आणि लिंग व उपयोगानुसार अचूक माहिती गोळा केली जाणार आहे.