बापरे! आता कोथिंबिरीला ‘एवढा’ भाव?

पुणे – सर्वसामान्यांपासून श्रीमंताच्या घरात भाजीला चव आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोथिंबिरीचे भाव कडाडले आहेत. घटलेली आवक, दर्जेदार मालाचे प्रमाण कमी आणि त्या तुलनेत जास्त असलेल्या मागणीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. घाऊक बाजारात जुडीला 10 ते 20 रुपये भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात 40 ते 50 रुपये जुडी भावाने कोथिंबिरीची विक्री होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले असून, गृहिणीचे बजेट कोलमडले आहे.

मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी (दि. 30जून) दीड लाख जुडी कोथिंबिरीची आवक झाली होती. सोमवारी (दि.1 जुलै) आणि मंगळवारी (दि.2जुलै) कमी आवक झाली आहे. त्या तुलनेत शहर, परिसरातून मागणी जास्त आहे. त्यामुळे कोथिंबिरीचे भाव तेजीत आहेत. त्यातच पुणे विभागात पाऊस सुरू आहे. बाजारात दाखल होणाऱ्या मालामध्ये ओलसर आणि कमी दर्जाच्या प्रमाण जास्त आहे. त्यामुळे विशेषत: दर्जेदार मालाला मागणी आहे. घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या जुडीला दर्जानुसार 10 ते 20 रुपये भाव मिळत असल्याची माहिती व्यापारी आणि श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली. सध्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. त्यामुळे कोथिंबिरीचे भाव घाऊक बाजारासह किरकोळ बाजारात वाढले आहेत. पुढील काही दिवस भाव तेजीत राहणार आहेत. त्यामुळे कोथिंबिरीला मागणी घटली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या ताटातून कोथिंबिर गायब झाली असल्याचे दिसून येत आहे.

बाजारात सध्या गुजरात येथून “सटाणा’ जातीच्या कोथिंबिरीची जास्त आवक होत आहे. ग्राहकांकडून गावरान कोथिंबिरीला जास्त मागणी असते. आता लागवड करण्यात आली आहे. महिन्याने कोथिंबिरीची जास्त आवक होईल.
– प्रकाश ढमढेरे, किरकोळ भाजीपाला विक्रेते.

Leave A Reply

Your email address will not be published.