जळोची – मी आता साहेबांना सुप्रियाला आणि मी स्वतः तिन्ही बाजूंनी सुपेची लोकसंख्या मोजतो. लोकसंख्येच्या आकड्यावरून नजर तुमचे एक मत नसेल तर कसे करायचे, अशी मिश्किल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टिप्पणी केली. बारामती तालुक्यातील सुपे येथे सुपे नगरपंचायतीचा विषय व्यासपीठावर चर्चेत आला. त्यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले की, सुपा नगरपंचायत करायची असेल तर माझी हरकत नाही. तुम्ही सर्वजण बसून ठरवा, काय तो निर्णय घ्या. तुमच्या सर्वांचीच हरकत नसेल तर मी नक्कीच सुपा नगरपंचायत करू शकतो, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुपे येथील एका कार्यक्रमात दिले. यानंतर पवार यांनी सुपेची लोकसंख्या किती आहे, असा प्रश्न सुपेकर यांना विचारला.
यावर उपस्थितांनी वेगवेगळे आकडे सांगितल्याने पवार यांनी ही टिप्पणी केली. यावेळी उपस्थितांत हशा पिकला. नगरपंचायतीला तुम्हाला ग्रामपंचायतीपेक्षा जास्त निधी मिळेल. त्यामुळे अनेक कामे मार्गी लागू शकतात. सुपे परगणा परिसरातील अनेक वाड्या त्यांची हरकत नसेल तर या नगरपंचायतीमध्ये सहभागी होऊ शकतात. मात्र, हा निर्णय सर्वस्वी तुमचा असेल, असेही पवार यांनी सांगितले.
पवार म्हणाले की, सध्या जेवढी वीज कमी पडत आहे. तेवढी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्याच्या अर्थखात्याकडे ऊर्जा खात्याला साडेतीन हजार कोटी रुपये मार्चअखेर दिले आहेत. हे विकासकामाचे पैसे ऊर्जा खात्याला द्यावे लागले, असे सांगतानाच ते म्हणाले की, तुम्ही वीज बिल वेळेत भरले तर विकासकामाचा निधी विकासकामांसाठी वापरता येईल.
15व्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतीला जातो. तो ग्रामपंचायतीला न देता त्यांची थकबाकी असलेली वीज बिल पाणीपट्टी यासाठी हा निधी द्यावा, अशी चर्चा झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या थकीत वीज बिल, पाणीपट्टी, घरपट्टी भरण्याचे आवाहन पवार यांनी
यावेळी केले.