छोट्यासह मोठया पडद्यावर नाग-नागीण कथांबाबत एक वेगळे आकर्षण आहे. सत्तरच्या दशकापासून आतापर्यंत विविध कथांमधून नवीन अंदाजात नागीणवर अनेक चित्रपट साकारण्यात आले आहेत. यात श्रीदेवी आणि रिना रॉय यासारख्या अभिनेत्रींनी मोठ्या पडद्यावर नागीणची जबरदस्त भूमिका साकारली होती. आता यात अभिनेत्री श्रद्धा कपूरच्याही नावाचा समावेश होणार आहे. ती पहिल्यांदाच अशी भूमिका साकारणार आहे.
याबाबत श्रद्धाने स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे. तिने ट्विट केले की, स्क्रीनवर नागीनची भूमिका साकारणे माझ्यासाठी खूपच आनंदाची बाब आहे. मी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांचा “नागीण’ आणि “निगाहे’ चित्रपट पाहून मोठी झालेली आहे आणि अशी भूमिका साकारण्याची माझी इच्छा देखील होती. आता ती लवकरच पूर्ण होणार आहे.
हा चित्रपट निखिल द्विवेदी हे प्रोड्यूस करणार असून विशाल फुरिया हे दिग्दर्शित करणार आहेत. यात श्रद्धा कपूर इच्छाधारी नागीणची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट तीन भागात तयार करण्यात येणार आहे. दरम्यान, देशात लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी श्रद्धा कपूरचा “बागी-3′ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यात टायगर श्रॉफ आणि रितेश देशमुख यांनी लीड रोल साकारले होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले होते.