पुणे – सध्याच्या “टेक्नोसेव्ही’ काळात पीएमपीने देखील “डिजिटल पेमेंट’चा पर्याय स्वीकारला आहे. पहिल्या टप्प्यात पिंपरी, भोसरी, चिंचवडगाव, निगडी या केंद्रांवर हा प्रयोग राबवण्यात आला आहे.
हल्ली अनेक ठिकाणी पेमेंट ऍपद्वारे ऑनलाइन व्यवहार होतात. एका क्लिकवर होणाऱ्या या व्यवहारांमुळे एकमेकांशी येणारा संपर्क आणि पैसे हाताळणे टाळता येते. याच धर्तीवर आता पीएमपीमध्ये प्रवाशांना “क्यूआर कोड’ स्कॅन करून तिकिटाचे पैसे देता येणार आहेत. यासाठी पीएमपी प्रशासनाने बॅंकांशी समन्वयदेखील साधला आहे. पासप्रमाणेच “मी कार्ड’ नावाचे कार्ड प्रवाशांना घेता येते. या कार्डद्वारे देखील तिकिटाचे पैसे प्रवासी देऊ शकतात. मात्र “मी कार्ड’द्वारे पैसे भरण्यासाठी वाहकाला कार्ड हाताळावे लागते. परंतु,”क्यूआर कोड’ मुळे एकदा स्कॅन करून पैसे देता येणार आहेत. यापूर्वी देखील “लॉकडाऊन’मध्ये शहरातील पास केंद्रावर अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना प्रवासी पास दिले जात होते. त्या केंद्रांवर रोख शुल्काऐवजी “क्यूआर कोड’ द्वारे “डिजिटल पेमेंट’ स्वीकारण्यात येत होते.
लॉकडाऊननंनतर मागील दोन आठवड्यांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये बससेवा सुरू केली आहे. परंतु, आसन पद्धतीत बदल केल्याने यापुढील काळात बसेसमध्ये केवळ 21 जणांनाच प्रवास करता येणार आहे. त्यामुळे “डिजिटल पेमेंट’ची योजना यशस्वी होऊ शकते, अशी खात्री वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.