नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बॅंक म्हणून गणल्या जाणाऱ्या स्टेट बॅंकेतही आता स्वेच्छा निवृत्ती योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी जे निकष निश्चीत करण्यात आले आहेत त्यानुसार बॅंकेतील 30 हजार 190 कर्मचारी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
या बॅंकेत मार्च 2020 मधील आकडेवारीनुसार एकूण 2 लाख 49 हजार कर्मचारी आहेत. गेल्या वर्षी याच महिन्यात बॅंकेतील कर्मचाऱ्यांची संख्या 2 लाख 57 हजार इतकी होती.
बॅंकेचा खर्च वाचवण्यासाठी आणि उपलब्ध कर्मचाऱ्यांचा अधिकाधिक वापर करून घेण्याच्या उद्देशाने ही योजना आखण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांची कमाल सेवा झाली आहे त्यांना या योजनेत सन्माननीय लाभ घेऊन बॅंकेच्या नोकरीतून बाहेर पडण्याचा पर्याय दिला जाणार आहे.
ज्यांना बॅंकेच्या सेवेतून बाहेर पडून अन्य क्षेत्रात काम करायचे आहे त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेच्या प्रस्तावाला अजून संचालक मंडळाकडून मान्यता मिळायची आहे. ज्यांनी नोकरीची 25 वर्ष पुर्ण केली आहेत आणि ज्यांचे वय 55 वर्षांच्या पुढे आहे त्यांना ही योजना लागू करण्याचा प्रस्ताव आहे.
येत्या 1 डिसेंबर पासून ती लागू केली जाणार असून त्याची मुदत फेब्रुवारी पर्यंत असणार आहे. योजनेतील निकषानुसार 11 हजार 565 अधिकारी आणि 18 हजार 625 कर्मचारी स्वेच्छा निवृत्ती घेण्यास पात्र असतील.