आता संजय राऊतांची बोलती बंद झाली;न्यायालयाच्या निर्णयानंतर किरीट सोमय्यांची टीका

मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेकडून अभिनेत्री कंगना राणावतविरोधात केलेल्या कारवाईवर आज मुंबई उच्च न्यायालायने आपला निर्णय दिला आहे. पालिकेच्या कारवाईला कंगनाने उच्च न्यायालयात दाद मागितली होती त्यावर न्यायालयाने पालिकेने सूडबुद्धीने कारवाई केली असल्याचे म्हटले आहे. याच न्यायालयाच्या निर्णयावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आपले मत व्यक्त करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. या निकालामुळे आता संजय राऊतांची बोलती बंद झाली असल्याचे म्हटले आहे.

महापालिकेकडून कंगनाच्या जुहू येथील कार्यालयातील बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगत कारवाई करण्यात आली होती. कंगनाने संजय राऊत यांनी धमकावल्याचा आरोप करत मुंबईचा पाकव्याप्त काश्मीर म्हटले होते. त्यानंतर कंगना विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला होता. त्यानंतर महापालिकेकडून ही कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई आपल्या वक्तव्याविरोधात असल्याचे सांगत कंगनाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी आज न्यायालयाने निर्णय दिला आहे. किरीट सोमय्या यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ट्विटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये सोमय्या यांनी, “कंगना रणौत प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. मुंबईच्या महापौरांनी आणि पालिका आयुक्तांनी आता राजीनामा द्यायला हवा. संजय राऊत यांची तर बोलतीच बंद झाली आहे,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

कंगनाच्या कार्यालयावरील बेकायदा बांधकामावर पालिकेने केलेली कारवाई सूडबुद्धीने असल्याचे सांगत उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने यावेळी पालिकेकडून पाठवण्यात आलेली नोटीस रद्द केली आहे. कंगनाने महापालिकेविरोधात नुकसानभरपाईचा दावा ठोकला असून न्यायालयाने कारवाईमुळे काय नुकसान झाले याचे मूल्यांकन करण्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. तसंच यापुढे कारवाई करण्यापूर्वी पालिकेने ७ दिवसांची नोटीस द्यावी असे उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे.

“महापालिका अधिकाऱ्याकडून नोटीस काढणे, तिच्या बंगल्यावर चिकटवणे, कारवाईचा आदेश, कारवाईसाठी केलेली तयारी, सुनावणी पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न ४० टक्केच कारवाई होणं, संजय राऊत यांनी कारवाईनंतर उखाड दिया म्हणणं हे सर्व याचिकाकर्त्यांच्या दाव्याचं समर्थन करणारं आहे,” असं उच्च न्यायालयाने निकाल सुनावताना म्हटलं आहे. कंगना कार्यालयाचा ताबा घेऊ शकते असंही मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. दरम्यान यावेळी न्यायालयाने कंगनाला सरकारविरोधात मत व्यक्त करत असताना संयम बाळगावा असा सल्ला दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.