पिंपरी – राज्यातील वाहनांची प्रदूषण नियत्रंण चाचणी (पीयूसी) आता ऑनलाईन करण्यात आली आहे. यामुळे बनावट कागदपत्राद्वारे काढली जाणारी पीयूसी प्रक्रियेला यामुळे चाप बसला असून याबाबत परिवहन आयुक्तांनी राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार आता पीयूसी चाचणी ही केवळ ऑनलाइनच होत आहे. पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालया अंतर्गत 15 सप्टेंबर पासूनच ही प्रणाली स्वीकारली असल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
पीयूसी चाचणीसाठी रस्त्यावर असलेल्या पीयूसी केंद्रांना परिवहन विभागाच्या ऑनलाइन प्रणालीशी जोडण्याचा निर्णय केंदीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार देशातील अनेक राज्यात ऑनलाईन पीयूसी केंद्रांना ऑनलाइन जोडण्यात आले आहे. मात्र, महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी याबाबत प्रभावी आंमलबजावणी करण्यात आली नव्हती.
याबाबत परिवहन आयुक्तांनी ऑनलाइन पीयूसी अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्वच प्रादेशिक कार्यालयांना सूचना दिल्या आहेत. पीयूसी केंद्र चालकांकडे यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याने ऑनलाइन प्रक्रियेला उशीर होत होता. मात्र आता अनिवार्य केल्यामुळे ही चाचणी ऑनलाइनच केली जाणार आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड कार्यालयाकडून 15 सप्टेंबर पासूनच ही प्रणाली स्वीकारली असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी सांगितले.