आता मेट्रो वरुन राजकीय श्रेयवाद

  • आगामी निवडणुकीसाठी श्रेय घेण्यासाठी चढाओढ

पिंपरी – पहिल्या टप्प्यातील स्वारगेट ते पिंपरीपर्यंत मेट्रोचे काम सुरू आहे. ही मेट्रो निगडीपर्यंत करण्याची पिंपरी-चिंचवडकरांची मागणी होती. केंद्र शासनाने सुचविलेल्या काही सुचनांप्रमाणे राज्य सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (दि.17) निगडीपर्यंत वाढीव मेट्रो मार्गाच्या प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानंतर राजकीय पक्षांमध्ये याचे श्रेय लाटण्याची चुरस सुरु झाली आहे.

निगडीपर्यंतच्या मेट्रोच्या कामाला केवळ आमच्या पक्षाच्या नेत्यांमुळेच मान्यता मिळाली असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरातील मतदार आकर्षित करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षातील पदाधिकारी करत असल्याचे दिसत आहे.
निगडीपर्यंतच्या वाढीव डीपीआरला डिसेंबर 2018 मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेने मंजुरी दिली होती. त्यानंतर त्याला फेब्रुवारी 2019 मध्ये राज्य शासनाने मान्यता देऊन तो केंद्र शासनाकडे पाठविला.

मात्र, नवीन आर्थिक सहाय्य धोरणाप्रमाणे केंद्र शासनाने खर्चाबाबत काही सूचना राज्य सरकारला केल्या होत्या. त्यानुसार पुन्हा राज्य शासनाच्या कॅबिनेटच्या बैठकीत सर्व सुधारणांसह वाढीव मेट्रो प्रकल्प मंजूर करण्यात आला. हा प्रकल्प राज्य मंत्रिमडळाता मंजूर होताच शहरातील पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून हे काम आमच्या पक्षाच्या प्रयत्नामुळेच झाले असल्याचा दावा केला आहे.

उपमुख्यमंत्र्याच्या प्रयत्नाने सफल – राष्ट्रवादी
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी हे काम उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नामुळेच झाले असल्याचे प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अधुरे ठेवलेले पिंपरी ते निगडी मेट्रोचे पिंपरी-चिंचवडकरांचे स्वप्न राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नामुळे व दूरदृष्टीच्या निर्णयामुळे साकार ्‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌होणार आहे. केंद्र सरकारने खर्च देण्यात काहीशी असमर्थता दर्शवली. मात्र, राज्य सरकारने या खर्चाचा भार उचलण्याची तयारी दर्शवली. हा निर्णय अजित पवार यांच्या दूरदृष्टीतून झाला असून त्यांनी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचे निगडीपर्यंत मेट्रोचे स्वप्न साकार करण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेतला असे संजोग वाघेरे यांनी नमूद केले आहे.

दादा-भाऊंमुळेच शक्‍य – भाजप
तर भाजप पदाधिकाऱ्यांनीही वाढीव मेट्रोचा प्रकल्प केवळ भाजपमुळेच झाला असल्याचा दावा केला आहे. हा प्रकल्प मंजूर करण्यामध्ये शहराचे कारभारी आमदार महेश लांडगे व लक्ष्मण जगताप यांच्या मोठा वाटा असल्याचा दावा महापालिकेचे क्रीडा सभापती उत्तम केंदळे यांनी केला आहे. ते म्हणाले, मेट्रोचा निगडीपर्यंत विस्तार पालिकेतील सत्ताधारी भाजपमुळे व त्यातही शहराचे दोन्ही कारभारी आमदार दादा व भाऊंमुळे झाला आहे, स्वारगेट ते पिंपरी मेट्रो मंजूर झाल्यानंतर त्याचा लाभ निम्म्या शहरालाही होणार नसल्याचे भाजप शहर कारभाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांच्या आदेशावरून स्थायी समितीने मेट्रो विस्ताराचा म्हणजे ती निगडीपर्यंत नेण्याचा डीपीआर तयार करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाला मंजुरी दिली. तसेच मेट्रो विस्तार कामाचा पूर्ण खर्च करण्याची तयारी पालिकेने दाखवल्याने मेट्रोचा निगडीपर्यंतचा मार्ग सुकर झाला.

श्रेयवादावरून ऱखडली घराची सोडत
महापालिकेच्या प्रत्येक विकासकामांमध्ये पक्षांना श्रेय घ्यायचे असते. त्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चुरस लागलेली असते. मात्र अनेकदा ही श्रेयवादाची लढाई टोकाला जाते. शहरातील स्वस्त घराच्या सोडतबाबत झालेली श्रेयवादाची लढाई शहरवासियांनी अनुभवली आहे. आता वर्षभरावर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक आली आहे. त्यामुळे शहरातील विकासकामांसाठी पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई चांगलीच जुंपणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील स्वस्त घरांची सोडत भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. मात्र या राजशिष्ठाचाराचे पालन केले नसल्याचा तसेच भाजप श्रेय लाटच असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आंदोलन केले. पालिका प्रशासनाला यामुळे सोडत रद्द करण्याची नामुष्की ओढावली. श्रेयवादाच्या या लडाईमध्ये अद्याप ही सोडत रखडलेली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.