लाहोर: पाकिस्तानमध्ये करोनामुळे परिस्थिती गंभीर आणि चिंताजनक होत आहे. झपाट्याने पसरणाऱ्या करोनाचा संसर्ग सर्वसामान्य जनतेसह केंद्रीय मंत्र्यांनाही होत आहे. काही दिवसापूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी याना कोरोनाची लागण झाली होती. त्यात आता पाकिस्तानच्या आरोग्यमंत्र्यांची भर पडली आहे. डॉ जफर मिर्जा हे करोना संक्रमित झाले आहेत. आरोग्यमंत्री मिर्जा यांच्या करोनाचा चाचणीचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला. त्यानंतर जफर मिर्जा यांनी स्वत:ला घरातच क्वारइंटाइन केले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेणे सुरु आहे.
सोमवारी मिर्जा यांनी ट्विटरद्वारे करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. ‘गेल्या काही दिवसांपासून मला करोनाची लक्षणे जाणवली होती. त्यावेळी योग्य ती काळजीही घेतली. करोनाची चाचणी केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मी स्वत:ला होम क्वारंटाइन करत आहे.’ यावेळी मिर्जा यांनी करोना लढ्यातील आपल्या सहकाऱ्यांचे कौतुक केले.
डॉ. मिर्जा पाकिस्तानमधील करोनाविरुद्धच्या लढाईचे नेतृत्व करत होते. त्यांना अनेक टीकांचा सामनाही करावा लागला होता. डॉ. मिर्जा आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर करोनाबाधित रुग्णांची संख्या लपवल्याचा आरोप आहे. परराष्ट्रमंत्री कुरैशी आणि आरोग्यमंत्री मिर्जा यांच्याशिवाय पाकिस्तानमधील इतर नेत्यांनाही करोनाचा संसर्ग झाला आहे. यामधील काही नेत्यांचा मृत्यूही झाला आहे. असद कैसर, शहबाज शरीफ, इमरान इस्माइल, सईद गनी आणि शेख राशिद यांनी करोनावर मात केली आहे. तर सैयद फजल आगा, शाहीन रजा, गुलाम मुर्तजा, मुनीर खान, मियां जमशेद दीन काकखेल यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.