शहरातील नाट्यगृहं 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार : रसिकांची प्रतीक्षा
पुणे : करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घातली आहे. मात्र, यातून नाट्यप्रयोग वगळण्यात आले असून, 50 टक्के क्षमतेने नाट्यगृहांना परवानगी मिळाली आहे. त्यामुळे नाट्यक्षेत्राला काहीसा मिळाला आहे. मात्र, प्रेक्षकांच्या बुकिंगअभावी नाट्य निर्मांत्यांमध्ये आगामी प्रयोगांबद्दल संभ्रमाचे वातावरण आहे.
करोनाची भीती आणि पर्यायाने प्रेक्षकांची कमी संख्या, निर्मात्यांची आर्थिक गणिते आदींमुळे नाट्यक्षेत्राचे गणित पुन्हा एकदा कोलमडले आहे. त्यामुळे नाट्यगृहे सुरू ठेवण्याची मागणी काही नाट्यसमूहांकडून करण्यात येत होती. याच पार्श्वभूमीवर नाट्यगृहे सुरू करण्याची परवानगी पालिकेने दिली आहे. आता येत्या काळात नाटक उभे राहण्यासाठी प्रेक्षकांनीच दाद देण्याची गरज असल्याचे मत कलावंत व्यक्त करत आहेत.
करोना निर्बंधामुळे नाट्य व्यावसायिकांना आर्थिक गणिते जुळवताना दमछाक होत आहे, तरीही नाट्यप्रेमी कलावंत आणि कार्यकर्ते मोठ्या हिरीरीने काम करत आहेत. त्यातच समाजातील काही दानशूर व्यक्तींकडून देणगी स्वरूपात थोडी फार मदत होत असल्याने नाटक व्यवसाय अजूनही तग धरून आहे.
– रवींद्र खरे, विश्वस्त, भरत नाट्य संशोधन मंदिर
करोना रुग्ण संख्या वाढत आहेत. मागील अनेक महिने नाट्यगृहे बंद होती. अनेकांसाठी “नाटक’ हे प्राथमिक उत्पन्नाचे साधन आहे. त्यामुळे आता नाटकाबाबत विचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांनीच नाटकांना दाद देण्याची गरज आहे.
– संकेत नगरकर, कलावंत