आता मेणबत्ती घोटाळा उघड

व्यवसायाच्या आमिषाने महिलांची फसवणूक : न्यायासाठी करंजेपूल पोलीस दूरक्षेत्रावर महिला धडकल्या

सोमेश्‍वरनगर/वाघळवाडी – कडकनाथ कोंबडी घोटाळ्यांनंतर आता मेणबत्ती व्यवसायाच्या आमिषाने ग्रामीण भागातील हजारो महिलांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. या “मेणबत्ती’ घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने कोट्यवधींचा घोटाळा असल्याची सध्या चर्चा आहे. दरम्यान, मेणबत्ती व्यवसायात फसवणूक झालेल्या सोमेश्‍वरनगर (ता. बारामती) परिसरातील महिलांनी रविवारी (दि. 22) करंजेपूल पोलीस दूरक्षेत्र गाठत तक्रार दाखल केल्याने “मेणबत्ती’ने खळबळ माजवली आहे.

या मेणबत्ती घोटाळ्यात एजंट अभिजित डोंगरे (रा. वाघळवाडी, ता. बारामती), राजन भिसे (रा. लोणंद, ता. फलटण) ही दोन नावे तक्रार अर्जाद्वारे समोर आली असली तरी पूर्ण चौकशी झाली नसल्याने गुन्हा दाखल झालेला नाही. तर यातील डोंगरे पोलिसांसमोर हजर झाला असून त्याने “हात’वर केल्याने हा मेणबत्ती घोटाळा आता कोणते वळण घेणार हे पाहावे लागणार आहे.

याबाबतची माहिती अशी की, बारामती तालुक्‍यातील सोमेश्‍वरनगर, निंबूत, लोणीभापकर व फलटण तालुक्‍यातील लोणंद येथे सुमारे वर्षभरापूर्वी या अनेक गावांतील अशिक्षित व बेकार महिलांना कामधंदा देण्यासाठी अभिजित डोंगरे व त्यांच्या सहकारी वर्गाने कच्चा माल पुरवतो, तुम्ही मेणबत्त्या तयार करुन द्या, सुरुवातीला 180 रुपये प्रति किलो इतका दर देऊन महिलांना काम करण्यास प्रवृत्त केले. अनेक महिलांनी प्रामाणिकपणे कष्ट केले. त्यांना सुरुवातीला मिळालेल्या मोबदल्याने त्यांनी पुन्हा कच्च्या मालाची मागणी केली. काहींना दिला तर काहींना कच्चा माल देखील दिला नाही व मेणबत्त्याही नेल्या नाहीत. दरम्यान, कच्च्या मालाची साधनसामग्री आणण्यासाठी प्रति महिला 20 हजार कर्ज रुपये घ्यावे लागेल व तुमच्या तयार मालातून मिळणाऱ्या नफ्यातून हप्ता वजा होईल, असे सांगून अजित मल्टी स्टेट सहकारी सोसायटीच्या कागदपत्रांवर व स्वाक्षरी घेऊन 100 रुपयांच्या स्टॅम्पवर सह्यादेखील घेतल्या; मात्र ही रक्‍कम कर्जाची आहे, असे न सांगता आमच्याच संस्थेद्वारे देत आहोत, असे सांगितले.

दरम्यान विठु माऊली या संस्थेचे नाव सांगत त्याद्वारे आपल्याला ही रक्‍कम मिळत असल्याचे सांगितल्याचे महिलांनी सांगितले. नंतर कच्चा मालदेखील बंद व हप्ते सुरू झाले. कर्जाची रकमेतील 20 हजार रुपये महिलांना न देता त्यातील 14 हजार रुपये कच्चा माल व यंत्रसामग्रीसाठी लागेल म्हणून परस्परच लाटले, त्यामुळे आता या महिलांचा रोजगार तर बंद झाला; मात्र कर्जाचे हप्ते न भरल्याने वकिलांमार्फत सोसायटीने नोटीसा बजावल्या आहेत. यामध्ये फसवणूक झालेल्या संगीता साळुंखे, रेखा कांबळे, पौर्णिमा जगताप, भारती गायकवाड, शोभा करे, सुजाता कारंडे, मंदाकिनी करे आदी महिलांनी करंजेपूल चौकी गाठत पोलीस हवालदार फणसे यांच्याकडे निवेदन दिले असून पोलिसांनी तक्रार दाखल करुन चौकशी सुरू केली आहे.

कोट्यवधींचा गैरव्यवहार?
मेणबत्त्या बनविण्याच्या लघु व्यवसायाचे आमिष दाखवलेल्या महिलांची संख्या पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती तालुका, तर सातारा जिल्ह्यातील लोणंद, खंडाळा आदी परिसर अशा ठिकाणी सुमारे दोन हजारांवर आहे. दिवसाला 4 ते 8 तक्रारी येत आहेत. प्रति महिला 20 हजारांचे कर्ज काढल्याने दोन हजार महिलांचे चार कोटी रुपये कर्ज होत आहे. एवढी मोठी रक्‍कम असल्याने या प्रकरणात आणखी मोठा सूत्रधार असण्याची शक्‍यता असून पोलिसांनी कसून तपास करून यातील गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे.

एजंट म्हणून मी काम करत असून स्वत:हून पैसे घेतलेले नाही. तसेच महिलांनी जो आरोप केला आहे तो चुकीचा आहे. मल्टीस्टेट सोसायटीतून कर्ज काढणार असून त्याबाबत संपूर्ण कल्पना दिल्यानंतरच स्वाक्षरी घेतल्या आहेत. दरम्यान, व्यवसाय बंद पडल्याने ही वेळ आली आहे.
-अभिजीत डोंगरे, संशयित


या फसवणुकीची व्याप्ती मोठी असून शनिवारी (दि. 21) काही महिलांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ज्यांची अशी फसवणूक झाली आहे. त्यांनी जवळच्या पोलीस चौकीत तक्रार दाखल करावी. सर्व तक्रारी गोळा केल्यावर नेमका फसवणुकीचा आकडा समोर येणार असून यातील दोषींवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
-सोमनाथ लांडे, सहायक पोलीस निरीक्षक, वडगाव निंबाळकर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here