अहवाल येईपर्यंत संशयित घरीच; धोका वाढण्याची भीती
पुणे – करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे शहरातील रुग्णालये आणि महापालिकेची कोविड केअर सेंटरही भरू लागली आहेत. त्यामुळे महापालिकेने आता संशयित रुग्णांचे संस्थात्मक विलगीकरण बंद केले आहे. करोना चाचणीसाठी नमुने दिलेल्या संशयितांना अहवाल येईपर्यंत घरीच थांबण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. अहवाल प्राप्त होताच संबंधितास जागा असेल, तर घरी आणि जागा नसल्यास पालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करून घेतले जात आहे.
जुलैमध्ये शहरात करोनाच्या नव्या बाधितांचा उच्चांक झाला. त्यामुळे महापालिकेची शहरातील कोविड केअर सेंटर, विलगीकरण केंद्र ओव्हरफ्लो झाली. त्यामुळे बाधितांपेक्षा संशयितांच्या विलगीकरणात प्रशासनाचा वेळ जात होता. अहवाल येईपर्यंत या संशयितांना सर्व सुविधा द्याव्या लागत होत्या. अहवाल येताच बाधितांना दाखल करून घेतले जात होते. तर निगेटिव्ह व्यक्तींना घरी सोडले जात होते. मात्र, या प्रक्रियेत वेळ जात होता.
तसेच पालिकेने आता रॅपिड ऍन्टिजेन टेस्टचे प्रमाण वाढवल्याने बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची चाचणी करून ती निगेटिव्ह आल्यास त्यांना घरीच ठेवले जात होते. त्यानंतर आता पुन्हा ऍन्टिजेन टेस्टचे प्रमाण कमी करण्यात आले असून, बाधितासोबत एकाच घरात राहणाऱ्या सर्वांची आरटी-पीसीआर चाचणी केली जात आहे. पण, संशयितांना घरीच ठेवण्यात येत आहे, तसेच त्यांच्या हातावर विलगीकरणाचा शिक्काही मारला जात नाही. तर, अहवाल समजताच त्या कुटुंबातील संबंधित व्यक्तीलाच फोन करून उपचारासाठी दाखल करून घेण्यात येत आहे.
संशयितांमुळे संसर्ग वाढण्याची भीती
पालिकेच्या नव्या धोरणामुळे अहवाल प्राप्त होईपर्यंत घरातील इतर व्यक्ती तसेच जवळच्या संपर्कातील व्यक्तींना संशयित व्यक्तींकडून करोना संक्रमणाची भीती आहे. संशयितांनी स्वॅब दिल्यानंतर अहवाल येण्यास 24 तास लागतात. त्यामुळे या चोवीस तासांत त्या व्यक्तीला लक्षणे दिसू लागल्यास त्याच्याकडून अहवालाची वाट पाहिली जाण्याची शक्यता असते. त्यामुळेही संसर्ग वाढण्याची भीती आहे.