अबब…दीड कि.मी. अंतरात 7 सिग्नल्स

मागील आठवड्यात 2 नव्यांची भर : चालक संभ्रमात

पुणे – स. गो. बर्वे चौक ते डेक्कन बसस्टॉप या मार्गावरील नव्याने बसवलेल्या दोन सिग्नलमुळे वाहनचालकांचा संभ्रम होत आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून हे सिग्नल कार्यान्वित झाले आहेत. मात्र, या सिग्नलची परिस्थिती पाहता सिग्नलवर उभे राहणे धोकादायक आणि संभ्रमाचे असल्याचे चित्र आहे.

स. गो. बर्वे चौक ते डेक्कन बसस्टॉप या दीड किलोमीटरच्या रस्त्यावर सुमारे 7 सिग्नल वाहन चालकांना पार करावे लागत आहेत. मागील आठवड्यामध्ये दोन सिग्नल बसविण्यात आले आहेत. त्यापैकी एक जंगली महाराज मठाजवळ असून, दुसरा सिग्नल संभाजी उद्यानाजवळ आहे. दोन्ही सिग्नल अपडेटेड असले, तरी या ठिकाणी असणारे झेब्रा क्रॉसिंग आखलेले नाही. सिग्नलला उभे राहणे धोकादायक आहे आणि न थांबल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई होऊ शकते. त्यामुळे नक्की काय करावे, असा प्रश्‍न वाहनचालकांच्या संभ्रमामध्ये भर टाकत आहे. यासह सिग्नलला उभे असताना मागून वेगाने वाहन आल्यास अपघाताची शक्‍यता आहे, अशी भीती वाहनचालकांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना व्यक्त केली. त्यामुळे ही समस्या सोडवण्याची गरज व्यक्‍त होत आहे.

आजपासून फक्‍त पिवळा दिवा लागणार
जंगली महाराज मठाजवळील सिग्नलबद्दल शिवाजीनगर वाहतूक शाखेचे अधिकारी रजेवर असल्याने अनभिज्ञ होते. मात्र दै. “प्रभात’ने त्यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता, रविवारी सायंकाळी सिग्नल तातडीने बंद करण्याचे आदेश त्यांनी दिले. जंगली महाराज मठाजवळ बसवलेल्या सिग्नलची मागणी वाहतूक शाखेने केली नव्हती. देवस्थान प्रशासनाने याबाबत कार्यवाही केली असल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. रविवारी सायंकाळी सिग्नल तातडीने बंद करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले आहेत. सोमवार सिग्नलचा केवळ पिवळा दिवा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवाजीनगर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी दिली.

नागरिकांनी वाहन सुरक्षितपणे आणि सावधानतेने चालवावे, यासाठी हा सिग्नल बसवण्यात आला आहे. या सिग्नलची मदत पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी होणार आहे.
– किरण बालवडकर, पोलीस निरीक्षक, डेक्कन वाहतूक शाखा

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.