बॉलीवूडमध्ये अमिताभ बच्चन या नावाचं फार मोठं प्रस्थ असल्याचे पाहायला मिळते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या मुलाने अभिषेक बच्चनने कलाविश्वात पदार्पण केले. काही मोजक्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची बाजू दाखविणाऱ्या अभिषेकने त्याची पावले वेबविश्वाकडे वळविली आहेत. लवकरच तो डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय आणि नावाजलेल्या ऍमेझॉन प्राइमच्या आगामी breathe in to the shadows या नव्या वेबसीरिजमध्ये अभिषेक झळकणार आहे. अलीकडेच या सीरिजचं पहिले पोस्टर प्रदर्शित झाले असून अभिषेकने सोशल मीडियावर शेअर केले आहे. विशेष म्हणजे हे पोस्टर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
2018मध्ये ऍमेझॉन प्राइमवर “ब्रीद’ ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ही सीरिज प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत उतरली होती. या सीरिजमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार आर. माधवन आणि अमित साध यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्यामुळे या सीरिजचा पुढील सीझन प्रदर्शित व्हावा अशी मागणी प्रेक्षकांकडून करण्यात येत होती.
सुरुवातीला breathe in to the shadows चं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर हा ब्रीदचा पुढचा सीझन असल्याचे अनेकांचे म्हणणे होते. मात्र हा पुढील सीझन नसून नवीन वेबसीरिज आहे.