मुंबई – ‘नागराज मंजुळे’ अष्टपैलू व्यक्तिमत्व असून ते केवळ दिग्दर्शक नसून लेखक, कवी, अभिनेतेही आहेत. आणि त्यांच्या या कलेचा आता डॉक्टरेट या पदवीने सन्मान करण्यात आला आहे. नागराज मंजुळे यांनी पिस्तुल्या, फॅंड्री, नाळ, सैराट आणि झुंड अशा एकाहून एक चित्रपटांची निर्मिती करत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
आणि त्यांच्या याच योगदानामुळे डी. वाय. पाटील. विद्यापिठाकडून नागराज पोपटराव मंजुळे यांना D. Litt ही पदवी बहाल करण्यात आली आहे. नागराज मंजुळे यांचे मित्र प्रा हनुमंत लोखंडे यांनी नुकतंच फेसबुकवर याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. नागराज मंजुळे यांनी डॉक्टर पदवी स्विकारतानाचे काही फोटो शेअर केले असून, त्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
दरम्यान, मराठीतील आघाडीचे दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे यांच्याकडे पाहिलं जात. नुकतंच नागराज यांचा बहुचर्चित ‘झुंड’ हा चित्रपटात प्रदर्शित झाला असून, झुंड चित्रपटाने तिकीट बारीवर जोरदार कमाई केली आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे महानायक ‘अमिताभ बच्चन’ मुख्य भूमिकेत दिसून आले आहेत.
झुंड चित्रपटात सोनसाखळी चोरणाऱ्या, गांजा विकणाऱ्या, गुंडगिरी करणाऱ्या मुलांची टीम बनवू पाहण्याचं स्वप्न उरी घेऊन निघणाऱ्या क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे यांची कहाणी या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. ‘झुंड’मध्ये बॉलिवूडचे महानायक म्हणजेच, अमिताभ बच्चन निवृत्त फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांची भूमिका साकारली आहे.