नीलकंठ मोहिते
इंदापूर नगरपरिषदेकडून रंगरंगोटी; स्वच्छतेचा संदेश; कचरा डेपोला झळाळी
रेडा – इंदापूर नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षणात देशात दहावा येण्याचा मान पटकावला. त्यामुळे 15 कोटी रकमेचा पुरस्कार नगरपरिषदेला प्राप्त झाला आहे. आता फाइव्हस्टार मानांकनासाठी स्वच्छता मोहिमेत वेग वाढवून वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे शहराला झळाळी येत आहे.
इंदापूर नगरपरिषद ही हागणदारीमुक्त ओडीआय प्लस हे प्रमाणपत्र मिळवणारी ठरली आहे. नागरिकांना सुविधा प्राप्त करून देण्यासाठी कारभारी धडपड आहेत. नगरपरिषदेने तीन स्टार आत्तापर्यंत मिळवले आहेत. त्यामुळे देशात दहावा क्रमांक मिळवता आला. नगरपालिकेला घवघवीत बक्षिसाची रक्कम नागरिकांना सुविधा देण्यासाठी वापरता येत आहेत. याच रकमेतून साडेसात कोटीचा पहिला हप्ता नगरपरिषदेच्या हद्दीतील विकासकामांसाठी प्राप्त झाला आहे. यातूनच शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
नगराध्यक्षा अंकिता शहा, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगण, नगरसेवकांनी पाच हजारांवर वृक्षलागवड करून हरित इंदापूर निर्माण केले आहे. कचरामुक्त शहरासाठी ओला, सुका कचरा संकलन करून सेंद्रिय खताची निर्मिती सुरू केली आहे. त्यामुळे सेंद्रिय खत विक्रीतून नगरपालिका आर्थिकदृष्ट्या मजबूत होत आहे. नगरपरिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच कचरा डेपोला झळाळी मिळाली आहे. कचरा डेपोचे विस्तारीकरण, नूतनीकरण वेगाने सुरू आहे. पत्राशेडमध्ये संकलनात पादत्राणे, रद्दी, कपडे, केस, पत्रा लोखंडाचे वेगळे पेंडल केले आहेत.
रात्रदिवस कचरा वाहतूक करणाऱ्या बारा गाड्या सुरू असल्याने शहरात कोठेही ढीग आढळून येत नाहीत. टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू निर्माण केल्या आहेत. शहराच्या हद्दीत लहान-मोठे दुभाजक, चौकात फूल व फळ झाडांचे वृक्षारोपण करत अनोखे इंदापूर निर्माण केले आहे. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण 2020 याकरिता भरीव कामगिरी करून शहराच्या नावलौकिकात भर पाडण्यासाठी प्रशासनासह सर्व नगरसेवकांनी मेहनत घेत आहेत. “होय आमच्या शहरात सार्वजनिक स्वच्छतेचे सर्वेक्षण होते’, असे फलक झळकत आहेत. सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर सुविचार रेखाटून बोलक्या केल्या आहेत.
मुख्याधिकाऱ्यांना तक्रारींचा निपटारा
नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी रामनिवास झंवर हे कारभार पुण्यातून व इतर भागातून मागील काही महिन्यांपूर्वी हाकत होते. मात्र, याच मुख्याधिकारीविरोधात दोन वर्षापासून मुख्य कार्यालयासमोर माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन झंवर यांची बदली झाली तरीदेखील सुरूच राहिले आहे. परंतु मागील काही महिन्यापासून नगरपरिषदेचा कारभार पाहण्यासाठी रुजू झालेले मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगण हे कारभार वेगवान हाकत आहेत. नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी दिवसभर कार्यालयात कार्यरत असतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका सोडता ठेंगण हे गैरहजर दिसत नाहीत. त्यामुळे अनेक जुन्या तक्रारींचा निपटारा होऊ लागला आहे.
प्रत्येक कामासाठी नवे रजिस्टर
तत्कालीन मुख्याधिकारी यांनी संबंधित कालावधीतील कामे करण्यासाठी प्रसिद्ध होणाऱ्या निविदा या नागरिकांची दिशाभूल करणाऱ्यांना देऊन कामे करण्याचा नवा पायंडा घातला होता. मात्र, नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी ठेंगण यांनी थेट शासनाच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक कामासाठी नवे रजिस्टर नगरपरिषदेच्या कार्यालयात सुरू केले आहे. मॅनेज अधिकाऱ्यांची मोठी कोंडी झाल्यामुळे मॅनेज प्रकाराला चाप बसला आहे.