बार्सिलोना – बार्सिलोना संघातून स्टार लिओनेल मेस्सी नसणे हे खूपच दुःखद आहे. ही घटना सर्वांसाठीच वेदनादायक आहे. या क्लबसाठी आणि अनेक स्पर्धेसाठी मेस्सीने दिलेले योगदान मोलाचे आहे.
परंतु आता मेस्सी हा भूतकाळ आहे. बार्सिलोनाला आपली पुढील वाटचाल सुरू करावी लागणार आहे, असे म्हणत बार्सिलोनाचे मुख्य प्रशिक्षक रोनाल्ड कोमन यांनी संघातील खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
बार्सिलोना येथे सुरू होणाऱ्या ला लीग स्पर्धेपूर्वी घरच्या मैदानावर आयोजित पत्रकार परिषदेत डच प्रशिक्षक रोनाल्ड कोमन बोलत होते. रोनाल्ड कोमन म्हणाले, मेस्सी हा महान खेळाडू आहे.
बार्सिलोना संघाचा तो प्रमुख आधारस्तंभ होता. यामुळेच आजही त्याची कमतरता सर्वांना जाणवत आहे. परंतु, मला वाटते की आपण भूतकाळाचा विचार करून वाटचाल करू शकत नाही. अशा गोष्टी घडत असतात. आता संघातील युवा खेळाडू भविष्यासाठी खूपच आशादायक आहे. म्हणूनच सध्याच्या संघाबाबतही मी समाधानी आहे, असे कोमन यांनी सांगितले.